लासूर स्टेशन गावात तब्बल दहा तास वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:04 AM2021-07-23T04:04:07+5:302021-07-23T04:04:07+5:30
लासूर स्टेशन : परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष ...
लासूर स्टेशन : परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून त्यांच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांच्या माथी बसत आहे. बुधवारी रात्री ते सकाळपर्यंत तब्बल दहा तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना दहा तास अंधारात राहावे लागले.
लासूर स्टेशन हे जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेचे गाव असूनदेखील येथील महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. विजेचा लंपडाव कायमच सुरू असल्याने नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; परंतु त्याला महावितरणकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यातच पावसाला सुरुवात झाली की नाही, तोच वीज खंडित होते किंंवा तांत्रिक अडचणीमुळे बंद केली जाते. याला महावितरणच कारणीभूत आहे. मान्सूनपूर्व विजेची कामे न केल्याने असा प्रकार घडू लागला आहे. बुधवारी रात्री, तर कहरच झाला. पावणेबारा वाजेच्या सुमारास विजेचा पुरवठा खंडित झाला. तो गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरळीत झालाच नाही. तब्बल दहा तास येथील नागरिकांना अंधारात राहावे लागले. तर नागरिकांना रात्रभर उकाड्याचा सामना करावा लागला.
----
महावितरणच्या कामाचे पितळ उघडे
लासूर स्टेशनचे ३३ केव्ही सबस्टेशन गंगापूर वीज वितरण कार्यालयाकडून बंद करण्यात आली. त्यामुळे लासूर स्टेशनसह वाडी-वस्तीतील नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. लासूरच्या सबस्टेशनसाठी अन्यत्र पर्यायी जोडणीची व्यवस्था असती, तर तब्बल दहा तास नागरिकांना त्रास सहन करावा लागला नसता; परंतु महावितरणचे नियोजन शून्य कामाचे पितळ यानिमित्त उघडे पडले आहे.