दिनेगाव स्थानकासाठी मिळणार दहा कोटी..!
By Admin | Published: June 1, 2017 12:31 AM2017-06-01T00:31:22+5:302017-06-01T00:33:51+5:30
जालना : जवसगाव (ता.बदनापूर) शिवारात होत असलेले ड्रायपोर्ट व औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या दिनेगाव रेल्वेस्थानकापर्यंत स्वतंत्र रेल्वेलाईन टाकली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जवसगाव (ता.बदनापूर) शिवारात होत असलेले ड्रायपोर्ट व औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या दिनेगाव रेल्वेस्थानकापर्यंत स्वतंत्र रेल्वेलाईन टाकली जाणार आहे. यासाठी दावलवाडी ते जवसगाव दरम्यान असलेले बंद दिनेगाव रेल्वेस्थानक पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या कामासाठी रेल्वेस जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडून रेल्वेस सुमारे दहा कोटींचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे.
जवसगाव शिवरात पाचशे एकरावर होत असलेल्या ड्रायपोर्टच्या सुरक्षा भिंतीचे मेसर्स अजितकुमार जैन समुहातर्फे सुरू असून, हे काम सध्या अंतीम टप्प्यात आहे. त्याचबरोबर ड्रायपोर्टच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या सुविधांसाठी जमीन सपाटीकरण करण्यात येत आहे. ड्रायपोर्टमधून थेट रेल्वेद्वारे मालवाहतू करता यावी यासाठी ड्रायपोर्टपासून दीड किलोमीर अंतरावर असलेल्या बंद दिनेगाव रेल्वेस्थानकापर्यंत स्वंतत्र रेल्वेलाईन टाकली जाणार आहे.यासाठीचा आरखडा तयार करण्याचे काम जेएनपीटीने रेल्वेच्या इंडियन पोर्ट रेल कार्पोरेशनला (आयपीआरसीएल) दिले आहे. त्याचबरोबर बंद दिनेगाव स्थानक पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव जेएनपीटीच्या संचालक मंडळाने रेल्वेच्या नांदेड विभागास दिला आहे. यासाठी जेएनपीटी दहा कोटींचे अर्थसाहाय्य करणार आहे. यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंद दिनेगाव स्थानकाची प्राथमिक पाहणी केली आहे. जेएनपीटीच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक पुढील आठवड्यात होत असून, यामध्ये ड्रायपोर्टच्या कामाबाबत चर्चा होणार असल्याचे जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे यांनी सांगितले.