दहा महिन्यांच्या चिमुकल्याचा बाप व चुलत्याकडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:39 AM2018-04-03T00:39:02+5:302018-04-03T16:01:03+5:30
क्रूरतेचा कळस : मृतदेह वाळूत दाबला; दोघा नराधमांना अटक, घाटनांद्रा येथील खळबळजनक घटना
सिल्लोड : जन्मदाता बाप व काकाने अवघ्या दहा महिन्यांच्या पोटच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह वाळूखाली दाबल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे उघडकीस आली. एवढेच नव्हे, तर या चिमुकल्याच्या आईलाही या दोघा नराधमांनी बेदम मारहाण करून तिलाही संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी नराधम बाप व काकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, बायको पसंत नसल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचे रात्री उशिरा पोलिसांनी सांगितले.
खून झालेल्या दहा महिन्यांच्या निष्पाप मुलाचे नाव सागर संदीप मोरे असून, खून करणाऱ्या आरोपींची नावे संदीप काशीनाथ मोरे (२८) व किशोर काशीनाथ मोरे (३४, दोघे रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड), असे आहे. बेदम मारहाण करण्यात आलेल्या मृत मुलाच्या आईचे नाव कविता संदीप मोरे (२२) असे आहे. दोघा आरोपींना न्यायालयाने नऊ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील कविताचे लग्न तीन वर्षांपूर्वी घाटनांद्रा येथील संदीप काशीनाथ मोरे याच्याशी झाले होते. काही दिवस संसार सुखात चालला. एका महिन्यापूर्वी दोघांत घरगुती कारणावरून वाद झाल्याने कविताच्या सास-याने तिला तिच्या माहेरी आणून सोडले होते; मात्र त्यानंतर आठ दिवसातच कविताच्या सासरची मंडळी व घरच्यांची समजूत काढून कविताला पुन्हा सासरी नेले.
हरवल्याची दिली तक्रार
३१ मार्च रोजी कविता व तिचा दहा महिन्यांचा मुलगा सागर घाटनांद्रा येथून बेपत्ता झाल्याची तक्रार बाबूराव पाटीलबा मोरे (रा. घाटनांद्रा) यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी कविता व सागरचा शोध सुरू केला होता. शोध सुरू असताना घाटनांद्र्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हरणबर्डी ओढ्याजवळ काही लोकांना कविता जखमी अवस्थेत दिसली. त्यांनी तिच्या माहेरच्या मंडळींना फोनवर माहिती दिली. नातेवाईकांनी तातडीने धाव घेऊन कविताला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोमवारी दुपारपर्यंत तिच्यावर उपचार सुरू होते.
माझ्या तान्हुल्याचा त्याच्या बापाने व काकाने खून केल्याची माहिती कविताने तिचे मामा अशोक आमटे यांना दिली. कविताच्या मामाने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात सागरचा खून झाल्याची तक्रार दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप सावळे, सरिता गाढे, हवालदार विष्णू पल्हाड, विलास सोनवणे, विठ्ठल डोके, दादाराव पवार करीत आहेत.
आईच्या डोळ्यादेखत घोटला गळा, तिने झाडावर बसून काढली रात्र
या नराधमांनी माय-लेकाला शेतात कोंडून ठेवले होते व ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना देऊन दिशाभूल केली. रविवारी रात्रभर संदीपने पत्नीला व मुलाला बेदम मारहाण केली. कविताने कशी तरी या नराधमांच्या तावडीतून सुटका केली व ओढ्याजवळील झाडावर जाऊन बसली. रविवारी पहाटे या दोघांनी झाडाखाली सागरचा गळा घोटला. हे दृश्य कविता पाहत होती; परंतु आरडाओरड केली तर मलाही ते मारून टाकतील, म्हणून गुपचूप बसली. प्रकरण अंगलट येईल म्हणून या दोघांनी गावापासून १ कि.मी. अंतरावरील ओढ्यातील वाळूच्या ढिगा-याखाली सागरचा मृतदेह लपवून ठेवला. रविवारी दुपारी कविता शेतात लपल्याची माहिती या नराधमांना मिळाली. त्यांनी दोन जणांना तेथे पाठवून कविताला विहिरीत ढकलून संपविण्याचा प्रयत्न केला; पण वेळीच कविताचे नातेवाईक व गावकरी धावून आल्याने तिचा जीव वाचला.
पसंत नव्हती म्हणून...
मी त्यांना पसंत नव्हती म्हणून ते मला नेहमी मारहाण करीत होते. मला व मुलाला संपविण्याची भाषा करीत होते, अशी माहिती कविताने सोमवारी रात्री पोलिसांना दिली. पोलिसांनी सोमवारी मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबादला पाठविला आहे.