खाजगी बसची दहा टक्के भाडेवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:09 AM2018-05-17T01:09:44+5:302018-05-17T01:10:18+5:30
खाजगी बस कंपन्यांकडून विविध मार्गांवरील बसच्या भाड्यात दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. प्रवासी हंगामासह डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खाजगी बस कंपन्यांकडून विविध मार्गांवरील बसच्या भाड्यात दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. प्रवासी हंगामासह डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळी सुट्यांमुळे विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीची झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.
सुट्यांच्या कालावधीत खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते. परंतु आता खासगी वाहनांना एस. टी. महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारणाºयांवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवली जात आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी सुट्यांचा हंगाम आणि डिझेल दर वाढल्याचे म्हणत भाडेवाढ करण्यात आली आहे. झालेली भाडेवाढ ही ‘एसटी’च्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट राहील, याची खबरदारी घेण्यात येत असल्याचा दावा ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून होत आहे.
औरंगाबादेतून नागपूर, मुंबई, पुणे, लातूर, सोलापूरसह विविध शहरांसाठी खाजगी बस धावतात. सोलापूरसाठी ३५० रुपये असलेले भाडे आता ४०० रुपये आकारण्यात येत आहे. तर सोलापूर स्लीपर बससाठी ५५० रुपयांवरून ६३० रुपयांपर्यंत भाडे घेण्यात येत
आहे.
हंगाम नसताना नागपूर स्लीपर बसचे भाडे ६३० ते ७५० रुपयांपर्यंत आकारण्यात येते. परंतु आजघडीला खाजगी बसकडून ९५० ते १०५० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येत आहे. अशाच प्रकारे अन्य मार्गांवरील भाड्यांमध्ये ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याची माहिती खाजगी बस कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली.