दिवाळीला दहा ट्रक फटाक्यांचा होणार धूमधडाका; पाच ठिकाणी उभारतेय फटाका मार्केट
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 14, 2022 01:05 PM2022-10-14T13:05:47+5:302022-10-14T13:06:31+5:30
शिवकाशीहून येणाऱ्या फटाक्यांमध्ये यंदा नावीन्यपूर्ण फटाके बघण्यास मिळणार आहेत
औरंगाबाद : लक्ष्मीपूजनानंतर फटाके वाजले नाहीत तर दिवाळी साजरी केल्यासारखे वाटणारच नाही, दिवाळी व आतषबाजीचे एवढे समीकरण जुळले आहे. यंदा शहरात ५ ठिकाणी फटाका मार्केट उभारले जात असून, १८७ तात्पुरती दुकाने थाटण्यात येणार आहेत. शिवकाशी व जळगावहून १० ट्रक फटाके बाजारात येणार असून, त्यातील दोन ट्रक बीड बायपास रोडवर पोहोचले आहेत. या ट्रकला अजून शहरात येण्यास परवानगी मिळाली नाही.
शिवकाशीहून येणाऱ्या फटाक्यांमध्ये यंदा नावीन्यपूर्ण फटाके बघण्यास मिळणार आहेत; पण त्यात सुतळी बॉम्ब, रॉकेट, फटाक्यांची लड, भुईनळे सर्वांत लोकप्रिय फटाके आहेत. शहरात अयोध्यानगरी मैदानावर ६५ दुकाने उभारण्यात येत आहेत. सिडको कलाग्राम येथे ४८ दुकानांसाठी परवानगी मागण्यात आली आहे. याशिवाय हडको टीव्ही सेंटर मैदानात ४०, बीड बायपास रोडवर २४ आणि छावणीत १० दुकानांसाठी फटाके विक्रेत्यांनी परवानगी मागितली आहे.
रेल्वे स्टेशन रोडवरील अयोध्यानगरीत पत्र्यांच्या शेडची दुकाने उभारली जात आहेत. प्रत्येक दुकानादरम्यान ५ फुटांचे अंतर सोडण्यात आले आहे. प्रत्येक दुकानासमोर अग्निशमन यंत्र, पाण्याने व वाळूने भरलेले ड्रम असतील. फटाके वितरक गोपाल कुलकर्णी यांनी सांगितले की, १० ट्रक फटाके शहरात येणार आहेत. यंदा बंधनमुक्त दिवाळी साजरी केली जाणार आहे. यामुळे फटाके मोठ्या प्रमाणात विक्री होईल, अशी शक्यता आहे.