मनपाने काढली दहा अनधिकृत धार्मिक स्थळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:48 AM2017-08-01T00:48:02+5:302017-08-01T00:48:02+5:30

शहरातील ११०१ धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सध्या सुरू आहे.

Ten unauthorized religious places that have been selected | मनपाने काढली दहा अनधिकृत धार्मिक स्थळे

मनपाने काढली दहा अनधिकृत धार्मिक स्थळे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यासाठी चक्क चतुर्थश्रेणी (सफाई कामगार) कर्मचाºयांचा वापर केला होता. या कामगारांनी दिलेल्या यादीनुसार शहरातील ११०१ धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सध्या सुरू आहे. खाजगी जागेवरील धार्मिक स्थळे मनपाने अनधिकृत ठरविली आहेत. सोमवारी मुकुंदवाडी भागातील एका खाजगी जागेवरील धार्मिक स्थळ पाडण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले होते. जागृत नागरिकांनी दाखविलेल्या कागदपत्रांमुळे मनपाच्या पथकाला परतावे लागले. मनपा प्रशासनाने दिवसभरात दहा अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. या कारवाईसंदर्भात शिवसेनेने खंडपीठात धाव घेतली.
सोमवारी सकाळी महापालिकेची चारही पथके कारवाईसाठी सकाळी १० वाजता बाहेर पडली. प्रथम नारळीबाग येथे खुल्या जागेवरील हनुमान मंदिर काढण्यात आले. मंदिर पाडू नये यासाठी परिसरातील नागरिकांनी, भाविकांनी बाराच आटापिटा केला. खंडपीठाच्या आदेशानुसार कारवाई सुरू असल्याचे वारंवार सांगितल्यानंतर मनपाने कारवाई केली. त्यापाठोपाठ जळगाव रोडवर सर्व्हिस रोडलगत असलेले मांगीरबाबा मंदिर काढण्यात आले. काचीवाडा येथे एक दर्गा होता. दर्ग्याची देखभाल करणाºया नागरिकांना विश्वासात घेऊन कारवाई करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून हा दर्गा असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे होते. बारापुल्ला गेट येथे मांगीरबाबाचे मंदिर होते. हे मंदिरही मनपाच्या पथकाने काढले.
सिडको एन-२ भागातील ठाकरेनगर येथे ग्रीन बेल्टमध्ये दुर्गामाता मंदिर बांधण्यात आले होते. श्रावण मासानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू होते. मनपाचे पथकप्रमुख वसंत निकम, महावीर पाटणी तेथे पोहोचले. मंदिर पाडू नये अशी विनंती माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे, नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांच्यासह शेकडो भाविकांनी केली. मंदिर पाडणार म्हणताच परिसरातील महिला भाविकांनी एकच आक्रोश सुरू केला. महिलांना अश्रू अनावर झाले होते. तब्बल दोन तास भाविकांची समजूत घातल्यानंतर मंदिर पाडण्यास सहमती दिली.
तत्पूर्वी सिडको एन-५ येथे उपायुक्त अय्युब खान, सहायक नगररचनाकार जयंत खरवडकर आपल्या पथकासह पोहोचले. या भागातील खुल्या जागेवर बांधण्यात आलेले छोटेसे श्रीकृष्ण मंदिर काढण्यात आले. रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरातील कालभैरव मंदिरही मनपाच्या पथकाने काढले. एकनाथनगर येथील ओंकारेश्वर मंदिर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील मोहिनीराज मंदिर, शिवाजी कॉलनी येथील महादेव मंदिर, सिडको एन-६ आविष्कार कॉलनी येथील मंदिर काढण्यात आले.

Web Title: Ten unauthorized religious places that have been selected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.