अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सश्रम कारावास
By Admin | Published: July 1, 2017 12:41 AM2017-07-01T00:41:45+5:302017-07-01T00:48:56+5:30
औरंगाबाद : पहिल्या पत्नीला सोडून तेरा वर्षांच्या मुलीसोबत संसार थाटून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम. सय्यद यांनी १० वर्षे सश्रम कारावास ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पहिल्या पत्नीला सोडून तेरा वर्षांच्या मुलीसोबत संसार थाटून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम. सय्यद यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि एकूण १५ हजार रुपये दंड ठोठावला.
या प्रकरणी खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथील पीडित मुलीच्या पित्याने ९ मार्च २०१३ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २१ जानेवारी २०१३ रोजी आरोपी राजू भिका अभंग (३०), राहणार सोयगाव, तालुका कन्नड याने पीडित मुलीला फूस लावून पळवून नेले. मुंबईसह इतरत्र फिरवून तिच्यावर अत्याचार केला आणि पहिल्या पत्नीला सोडून अल्पवयीन मुलीशी संसार थाटला. पीडित मुलीच्या पित्याने तक्रार दिल्यानंतर सात-आठ महिन्यांनंतर संबंधित मुलगी तिच्या नातेवाईकांकडे सापडली तेव्हा ती गरोदर होती. त्यानंतर आरोपी राजूला मुंबईतून अटक करण्यात येऊन त्याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६ आणि ३६३, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ५ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले.
सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम ३७६ व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ५ व ६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला २ वर्षे जादा कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सक्तमजुरी आणि कलम ३६३ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने जादा कारावास भोगावा लागेल, असेही आदशात म्हटले आहे. आरोपीने दंड भरल्यास ती रक्कम पीडितेला देण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.