भाडेकरू संकटात तर घर मालकही सापडले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:03 AM2021-05-30T04:03:56+5:302021-05-30T04:03:56+5:30

शेख महेमूद वाळूज महानगर : कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला असून, छोटे-मोठे व्यवसाय बंद पडल्याने भाड्याच्या ...

Tenants are in trouble and landlords are in trouble | भाडेकरू संकटात तर घर मालकही सापडले अडचणीत

भाडेकरू संकटात तर घर मालकही सापडले अडचणीत

googlenewsNext

शेख महेमूद

वाळूज महानगर : कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला असून, छोटे-मोठे व्यवसाय बंद पडल्याने भाड्याच्या घरात वास्तव्यास असणारे भाडेकरू संकटात सापडले आहेत. तर भाडे थकल्यामुळे व भाडेकरू घर सोडून जात असल्याने घरमालकांच्या अडचणीत भर पडली आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामुळे देशाच्या विविध भागांतून हजारो कामगार उद्योगनगरीत आले. परिसरातील बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, वाळूज, वडगाव, साजापूर, रांजणगाव, जोगेश्वरी, कमळापूर आदी ठिकाणी स्थायिक झाले आहेत. कायमस्वरूपी कामगारांनी कर्ज काढून घरे बांधली असून कंत्राटी काम करणारे हजारो कामगार या परिसरात किरायाच्या घरात वास्तव्यास आहेत. कामगार भाडेकरूकडून दरमहा चांगले भाडे मिळत असल्याने काहींनी बँकेकडून कर्ज काढून किरायाने देण्यासाठी नवीन रूमही बांधल्या आहेत. मात्र, गत दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आल्याने अनेक कामगार आपल्या मूळगावी परतले आहेत. या परिसरात छोटे-मोठे व्यवसाय करून किरायाच्या घरात राहणारे व्यवसाय बंद असल्याने अडचणीत सापडले आहेत. गत तीन-चार महिन्यांपासून कोरोनाचे संकट पुन्हा उद्भवल्यामुळे वाळूज महानगरातील कामगार व घरमालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने कंपन्यातील उत्पादनात घट झाल्याने कामगारांना कमी केले जात असून याचा सर्वाधिक फटका कंत्राटी कामगारांना बसत आहे. रोजगार हिरावला गेल्याने कुटुंबाचे पालनपोषण व घरखर्च भागविण्यासाठी कंत्राटी कामगारांना उधारी, उसनवारी करावी लागत आहे. याशिवाय लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने हॉटेल, कापड दुकाने, मोबाइल शॉपी व इतर ठिकाणी काम करणारे कामगारही बेरोजगार झाल्याने अनेक जण मूळगावी परतत असल्याचे चित्र वाळूज महानगरात पाहावयास मिळत आहे.

रोजगार हिरावल्याने संकटात भर

कोरोनामुळे रोजगार हिरावला गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातील बहुतांश किरायाच्या घरात राहत असल्याने घरभाडेही थकले असून कुटुंबाचे पालनपोषण करणेही अवघड बनले आहे. थकीत भाडे वसूल करण्यासाठी घरमालकाचा तगादा सुरू असल्याने कुटुंबाची ओढाताण होत असून भाडे कसे भरावे, असा सवाल पूजा शेळके, शिवाजी पारेकर, रफिक शेख, मिलिंद कांबळे आदींनी उपस्थित केला आहे. घरभाडे भरण्यासाठी उधारी, उसनवारी करावी लागत असून काहींनी दागिने मोडून घरभाडे भरल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर काही भाडेकरूंनी सांगितले.

घरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरावे कसे?

वाळूज उद्योगनगरीत कामगार तसेच इतर ठिकाणी छोटा व्यवसाय करणाऱ्याकडून घर भाड्यापोटी दरमहा चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेकांनी बँका तसेच एलआयसीकडून कर्ज काढून किरायाने देण्यासाठी घरे बांधलेली आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे कामगार मूळगावी परतत असल्याने अनेकांनी घरे रिकामी करून गावाचा रस्ता धरल्याने घरमालकांच्या आडचणीत वाढ झाली आहे. घरे बांधण्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न सिडको वाळूज महानगरातील अशोक डोमाटे, बजाजनगरातील श्रीकृष्ण भोळे, जोगेश्वरीतील सूर्यभान काजळे, रांजणगावातील बाबासाहेब बटुळे आदी घरमालकांना सतावत आहे.

--------------------------

Web Title: Tenants are in trouble and landlords are in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.