पुढील आठवड्यात निघणार मेहमूद दरवाजाची निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:02 AM2021-09-26T04:02:26+5:302021-09-26T04:02:26+5:30
औरंगाबाद : ऐतिहासिक पानचक्कीच्या वैभवात भर घालणारा मेहमूद दरवाजा मोडकळीस आला असून, महिनाभरापूर्वी महापालिकेने दरवाजातून वाहतूक बंद केली. स्मार्ट ...
औरंगाबाद : ऐतिहासिक पानचक्कीच्या वैभवात भर घालणारा मेहमूद दरवाजा मोडकळीस आला असून, महिनाभरापूर्वी महापालिकेने दरवाजातून वाहतूक बंद केली. स्मार्ट सिटीकडून डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अजूनही काम सुरू झाले नाही. पावसामुळे दरवाजाची अवस्था अधिक बिकट झाली आहे. हे गेट कोणत्याही क्षणी कोसळू शकते, अशी स्थिती आहे.
दोन महिन्यांपूर्वी एका मोठ्या वाहनाने दरवाजाला धडक दिली. त्यामुळे दरवाजाची कमान (आर्च) मध्यभागी वाकली. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दरवाजाची पाहणी केली होती. स्मार्ट सिटीच्या निधीतून त्वरित कामाला सुरुवात करा, असे त्यांनी निर्देश दिले. महिना उलटला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील इतर दरवाजांची दुरुस्ती सुरू आहे. मेहमूद दरवाजासाठी स्मार्ट सिटी प्रशासन स्वतंत्र निविदा काढून डागडुजी करणार, अशी घोषणा केली होती. त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. दरवाजाच्या आसपास असलेली अतिक्रमणेही मनपाने पाडली. डागडुजीच्या कामाला विलंब झाल्यास दरवाजा कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लवकरच काम सुरू होईल
स्मार्ट सिटीच्या सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले की, दरवाजाच्या डागडुजीसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले. खर्च जास्त होत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पुढील आठवड्यात निविदा प्रसिद्ध होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरुवात होईल.
आधी काम, नंतर निविदा करा
दरवाजा सध्या कोसळण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन महिन्यांपासून स्मार्ट सिटी प्रशासन अंदाजपत्रक, निविदा यामध्ये वेळ वाया घालवत आहे. शहरात दरवाजाची कामे करणारे असंख्य कंत्राटदार नाहीत. एक किंवा दोनजणच हे काम करू शकतात. त्यांच्याकडूनच युद्धपातळीवर काम करून घेतले पाहिजे. एकदा दरवाजा कोसळला तर डागडुजी करणे अशक्यप्राय होईल, असे इतिहास तज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी सांगितले.