संजय शिरसाटांच्या संपत्तीत दहापट वाढ; पाच वर्षांत ३ कोटीवरून ३३ कोटीवर, तीन गुन्हे प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:13 PM2024-10-26T14:13:43+5:302024-10-26T14:15:00+5:30
आज रोजी त्यांच्याकडे ४४ लाख ७८ हजार रोकड आहे, तर विविध बँकांचे त्यांच्याकडे २६ कोटी ४५ लाख ७५ हजार ९२२ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : सलग दोनवेळा औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले संजय शिरसाट यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार पाच वर्षांत त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत दहापट वाढ झाल्याचे दिसून येते. पाच वर्षांच्या कालावधीत त्यांची संपत्ती ३ कोटी ३१ लाखावरून तब्बल ३३ कोटी ३ लाखांवर गेली आहे. आज रोजी त्यांच्याकडे ४४ लाख ७८ हजार रोकड आहे, तर विविध बँकांचे त्यांच्याकडे २६ कोटी ४५ लाख ७५ हजार ९२२ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे.
शिरसाट यांनी शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे ४ कोटी ३७ लाख ६० हजार ७६१ रुपये किमतीची शेतजमीन, तर ४ कोटी ७० लाख ४५ हजार ८६० रुपयांचे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फ्लॅट आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे ६३ लाख ९८ हजार रुपये किमतीची जमीन आणि ५ कोटी ६५ लाख ५५ हजार ९८० रुपये किमतीचे फ्लॅट आहेत. त्यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत १९ कोटी ६५ लाख ३२ हजार १५ रुपये इतकी आहे.
आ. शिरसाट यांच्याकडे पत्नीच्या नावे १८ लाख ५०० रुपये किमतीची कार आहे. तसेच सोन्याचे दागिने आणि एलआयसी, विविध बँकांतील ठेवी अशी एकूण १३ कोटी ३७ लाख ८८ हजार ४७२ रुपयांची गुंतवणूक आहे. आ. शिरसाट यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविताना आयोगाला सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणानुसार त्यांच्याकडे १ कोटी ९५ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता होती, तर त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी ३६ लाख ५० हजार ६८० अशी एकूण ३ कोटी ३१ लाख ५० हजार ६८० रुपयांची मालमत्ता होती. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत दहा पट वाढ झाल्याचे दिसून येते.
एकूण मालमत्ता -३३ कोटी ३ लाख २० हजार ४८६ रुपये
स्थावर मालमत्ता : १९ कोटी ६५ लाख ३२ हजार १५ रुपये
जंगम मालमत्ता (सोने चांदीचे दागिने, कार, गुंतवणूक) :१३ कोटी ३७ लाख ८८ हजार ४७२ रुपये
रोकड : ४७ लाख २९ हजार ६९२ रुपये
कर्ज देणी : २६ कोटी ४५ लाख रुपये
तीन गुन्हे प्रलंबित
आ. शिरसाट यांच्याविरोधात वाळूज दोन आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्ह्यांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहेत. या गुन्ह्याचा निकाल अद्याप लागलेला नाही.