दहा लाखांचा घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2016 12:44 AM2016-10-09T00:44:46+5:302016-10-09T01:07:31+5:30

औरंगाबाद : विविध प्रकारचे बक्षीस लागल्याचे मोबाईलवरून आमिष दाखवून एका व्यापाऱ्यास अज्ञात मोबाईलधारकांनी तब्बल ९ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातला

Tens of millions of dollars | दहा लाखांचा घातला गंडा

दहा लाखांचा घातला गंडा

googlenewsNext


औरंगाबाद : विविध प्रकारचे बक्षीस लागल्याचे मोबाईलवरून आमिष दाखवून एका व्यापाऱ्यास अज्ञात मोबाईलधारकांनी तब्बल ९ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, भानुदासनगर येथील रहिवासी मनोज प्रेमसिंग चव्हाण हे २३ आॅगस्ट रोजी दुपारी घरी असताना अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन करून तुम्ही खूप नशीबवान आहात. आमच्या कंपनीने तुमच्या मोबाईल नंबरची विशेष ग्राहक म्हणून निवड केली आहे. कंपनीकडून तुम्हाला लोटो कंपनीचा ट्रॅक सूट, शूज, सन गॉगल मिळणार आहे. हे बक्षीस प्राप्त करण्यासाठी कंपनीच्या बँक खात्यात ४ हजार ९९९ रुपये भरावे लागतील, असे सांगितले. महागड्या वस्तू मिळत असल्याने चव्हाण यांनी त्याच दिवशी ही रक्कम आरोपीच्या बँक खात्यात जमा केली. २५ आॅगस्ट रोजी आरोपीने फोन करून तुम्हाला ह्युंदाई कंपनीची कार देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी तुम्हाला २० हजार रुपये बँकेत जमा करावे लागतील. ही रक्कम बँकेत जमा केल्यानंतर २६ आॅगस्ट रोजी आरोपीने पुन्हा फोनवर संपर्क साधून तुमच्या वडिलांच्या नावे आय. डी. तयार करण्यासाठी २० हजार रुपये भरण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने आरटीओ फीस म्हणून ३२ हजार रुपये भरण्यास सांगितले आणि चव्हाण यांनी भरलेही. ही रक्कम बँक खात्यात जमा केल्यानंतरही आरोपीने रक्कम मिळालीच नसल्याचे सांगितल्याने चव्हाण यांनी आणखी ३२ हजार रुपये आरोपीच्या खात्यात भरले. ४ सप्टेंबर रोजी प्रोझोन मॉल येथे कंपनीने एक कार्यक्रम आयोजित केला असून, या कार्यक्रमात तुम्हाला कार मिळणार आहे.
या कार्यक्रमाचा खर्च तुम्हाला करावा लागेल, असे म्हणून त्यासाठी त्यांच्याकडून ४१ हजार रुपये भरून घेतले. ३० सप्टेंबर रोजी उदय यादव नावाच्या भामट्याने बँक गॅरंटीसाठी ४१ हजार रुपये जमा करण्यास सांगितले, अशा प्रकारे तब्बल ९ लाख ९० हजार रुपये चव्हाण यांनी आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यात वर्ग केले. एवढी मोठी रक्कम भरल्यानंतरही आरोपींकडून एकही बक्षीस त्यांना प्राप्त झाले नाही. उलट आरोपींचे फोन सारखे बंद लागत आहेत. फसवणूक केल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी शुक्रवारी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: Tens of millions of dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.