सोयगावात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळेना; प्रशासनाच्या बंधनाने लाभार्थ्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:38 PM2019-01-30T12:38:05+5:302019-01-30T12:38:35+5:30
साठवलेल्या वाळूवर प्रशासनाची करडी नजर आहे तर दुसरीकडून वाळू मिळण्यास अनंत अडचणी येत आहेत.
सोयगाव (औरंगाबाद ) : वाळूपट्टे नसलेल्या सोयगाव तालुक्यात दोन महिन्यापासून बांधकामांना वाळू मिळत नाही. तसेच इतरत्र वाळूपट्ट्यातील उपशावर प्रशासनाने बंधन लादली आहेत. यामुळे घरकुल व शौचालय लाभार्थ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
सोयगाव तालुक्यात सन-२०१७-१८ या वर्षातील मंजूर झालेली विविध योजनेतील घरकुल, वैयक्तिक शौचालये यासह नवीन वर्षात मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजना घरकुल, शबरी भिल, रमाई आवास आदी योजनांचे लाभार्थी आहेत. मात्र तालुक्यात वाळूपट्टे नाहीत आणि इतरत्र वाळू उपशावर प्रशासनाची कडक बंधने आहेत. तसेच साठवलेल्या वाळूवर प्रशासनाची करडी नजर आहे तर दुसरीकडून वाळू मिळण्यास अनंत अडचणी येत आहेत.
यामुळे योजनेतील मंजूर बांधकामाला वाळू अभावी खीळ बसली आहे. पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात ४६० च्यावर घरकुले मंजूर आहेत. याच्या बांधकामा अभावी लाभार्थ्यांचा पहिला हप्ता खात्यावर वर्ग झाला नाही. यामुळे या योजना केवळ कागदावर मंजूर असल्या समान ठरत आहेत.