शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावरुन रेल्वेस्थानकात तणाव
By राम शिनगारे | Published: September 20, 2022 06:10 PM2022-09-20T18:10:47+5:302022-09-20T18:11:56+5:30
रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक एकवर शिवाजी महाराजांचे तैलचित्र लावण्यात आलेले आहे.
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावर शिवजयंतीला शिवाजी महाराज यांचे तैलचित्र लावण्यात आले होते. त्याच तैलचित्राच्या समोर एक स्टॉल उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्याविषयीची माहिती मिळाल्यानंतर माजी महापौर नंदकुमार घोडेले, छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानकावर धाव घेत रेल्वे अधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी धारेवर धरले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तैलचित्राच्या समोर स्टॉल उभारण्याचा निर्णय बदलला. त्यादरम्यान रेल्वेस्थानकावर तणाव निर्माण झाला होता.
रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक एकवर शिवाजी महाराजांचे तैलचित्र लावण्यात आलेले आहे. त्या तैलचित्राच्या शेजारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही तैलचित्र आहे. केंद्र शासनातर्फे छोट्या व्यावसायिकांना स्थानकावर स्टॉल उभारण्यासाठी जागा देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रासमोरच एक स्टॉल उभारण्यात येत होता. त्याविषयी माहिती मिळताच माजी महापौर घोडेले यांच्यासह छावा संघटनेचे योगेश केवारे, सुनील महाजन, राहुल बनसोड, योगेश डेरे, अमित गायकवाड, अंकुश केवारे, मजहर खान आदींनी स्थानकावर धाव घेतली. या स्टॉलमुळे महाराजांचे तैलचित्र झाकून जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मात्र, अधिकाऱ्यांनी निर्णय बदलण्यास नकार देत त्याचठिकाणी स्टॉल उभारला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे वेदांतनगरचे निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच लोहमार्गचे निरीक्षक साहेबराव कांबळे, रेल्वे पोलीस बलाचे अधिकारी, जवान घटनास्थळी दाखल झाले. त्याचेवळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शिवप्रेमींसोबत चर्चा करीत स्टॉल उभारण्याचा निर्णय मागे घेत स्टॉल काढण्याचा आदेश दिला. यानंतर शिवप्रेमी शांत झाले.
तैलचित्राचे केले पूजन
शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राच्या समोरच स्टॉल उभारण्याच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर शिवप्रेमींनी घोडेले यांच्या हस्ते तैलचित्राचे पूजनही यावेळी केले. तसेच यापुढे असा प्रयत्न झाल्यास शिवप्रेमी शांत राहणार नाहीत, असा इशाराही घोडेले यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.