रामगिरी महाराजांच्या व्हिडिओवरून वैजापुरात तणावपूर्ण शांतता; छत्रपती संभाजीनगरातही पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 02:22 PM2024-08-16T14:22:02+5:302024-08-16T15:14:10+5:30

वैजापूर शहरात ४ दिवस जमावबंदीचे आदेश; अफवांपासून दूर राहण्याचे पोलिसांचे आवाहन 

Tension in Vaijapur over Ramgiri Maharaj's viral video | रामगिरी महाराजांच्या व्हिडिओवरून वैजापुरात तणावपूर्ण शांतता; छत्रपती संभाजीनगरातही पडसाद

रामगिरी महाराजांच्या व्हिडिओवरून वैजापुरात तणावपूर्ण शांतता; छत्रपती संभाजीनगरातही पडसाद

वैजापूर/छत्रपती संभाजीनगर: सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमांमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर वैजापूर येथे गुरुवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जमाव माघारी फिरला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहर आणि तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वैजापूरमध्ये चार दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच या घटनेचे पडसाद आज दुपारी छत्रपती संभाजीनगरात देखील पाहायला मिळाले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पांचाळे गावामध्ये प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराजांनी एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. काही वेळातच या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. यावरून काहींनी आक्रमक होत रात्री आठ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. 

दरम्यान, पोलीस अधिक्षक डॉ विजय कुमार राठोड, अतीरिक्त  पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधिक्षक महक स्वामी, पोलीस निरीक्षक  श्यामसुंदर कौठाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका असं आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केले आहे.  तसेच वैजापूर शहरात उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जराड यांनी चार दिवस जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

आज तणावपूर्ण शांतता, पोलिसांनी केले आवाहन
व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुरुवारी रात्री गंगापूर येथेही पोलिस स्टेशनसमोर पहाटे दोन वाजेपर्यंत जमाव जमला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमावाने माघार घेतली. दरम्यान, आज वैजापूरसह गंगापूर येथेही तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी शांतता राखावी त्याचबरोबर अफवा पसरवणारे, प्रक्षोभक मेसेज फॉरवर्ड करु नये. तसेच गैरसमज करणारे मेसेज फॉरवर्ड करु नये, असे आवाहन  छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण  पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी केले आहे. 

छत्रपती संभाजीनगरात पडसाद, महाराज मंगळवारी करणार भूमिका स्पष्ट
रामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वैजापुरात गुरुवारी रात्री आंदोलन करण्यात आले. वैजापूर शहर, तालुक्यातील खंडाळा आणि गंगापूर येथे महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत पोलिस स्टेशनसमोर पहाटेपर्यंत आंदोलन करण्यात आले. तर आज छत्रपती संभाजीनगर शहरात आंदोलनास सुरुवात झाली. क्रांती चौक पोलिस स्टेशनसमोर काही वेळ आंदोलन केल्यानंतर जमावाने सिटी चौक पोलिस स्टेशनकडे मोर्चा वळवला. येथे मोठा जमाव जमला असून महाराजांच्या त्वरित अटकेची मागणी करत आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. शहरात परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी रामगिरी महाराज रक्षाबंधनाच्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे.  

Web Title: Tension in Vaijapur over Ramgiri Maharaj's viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.