औरंगाबादेतील तणाव निवळला; परिस्थिती नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:05 AM2018-02-23T01:05:18+5:302018-02-23T01:05:36+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले पोस्टर समाजकंटकांनी फाडल्यावरुन शहराच्या अनेक भागात गुरुवारी निर्माण झालेला तणाव रात्रीतून निवळला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे रात्री पोलीस अधिका-यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले पोस्टर समाजकंटकांनी फाडल्यावरुन शहराच्या अनेक भागात गुरुवारी निर्माण झालेला तणाव रात्रीतून निवळला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे रात्री पोलीस अधिका-यांनी स्पष्ट केले.
शिवजयंतीनिमित्त लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर गुरुवारी सायंकाळी तीन समाजकंटकांनी फाडल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. शिवप्रेमी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, गारखेडा परिसर, मुकुंदवाडी, सिडको, हडको, टीव्ही सेंटर परिसरातील व्यापाºयांनी आपापली दुकाने बंद केली. पोलिसांनी तत्परता दाखवून तीन संशयिताना गुरुवारी रात्रीच ताब्यात घेतले.
गारखेडा परिसरातील विजयनगरलगतच्या शिवनेरी कॉलनीत शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. तीन समाजकंटकांनी हे पोस्टर्स फाडले. यानंतर ते तिघे लोकांना चाकू दाखवून तेथून निघून गेले. ही घटना कळताच नागरिकांनी पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली. त्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. शिवाजी महाराजांचे पोस्टर्स फाडण्यात आल्याचे कळताच पुंडलिकनगर, विजयनगर, गारखेडा परिसर, गजानन महाराज मंदिर चौक, हनुमाननगर, जयभवानीनगर, मुकुंदवाडी, सिडको कॅनॉट मार्केट, टीव्ही सेंटर येथील व्यापाºयांनी दुकाने बंद केली होती. या घटनेनंतर पोलीसांनीही तातडीने पावले उचलत पोस्टर फाडणाºया तरुणांना शोधून ताब्यात घेतले. त्यामुळे रात्रीतून हा तणाव निवळण्यास मदत झाली.
आरोपींना अटक, शांतता राखावी -उपायुक्त श्रीरामे
पोलिसांनी त्या तिन्ही समाजकंटकांना अटक केली आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले. टीव्ही सेंटर येथे जमाव जमल्याचे कळताच तेथे शीघ्र कृतिदलाचे जवान आणि सिडको विभागाचे सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी धाव घेतली. तर पुंडलिकनगर ठाण्यात आपण स्वत: पोलीस निरीक्षक एल. ए. शिनगारे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढविला असून, विविध ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
टी.व्ही. सेंटर येथे जमाव
टी.व्ही. सेंटर येथे सुमारे दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उभा होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी मोठा फौजफाटा तेथे तैनात केला. रात्री उशिरापर्यंत सिडको, हडको आणि टी.व्ही. सेंटर परिसरात तणावपूर्ण शांतता होती.