'ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन'; स्वतःहून तपासणीस गेलेल्या दुबई रिटर्न ओमायक्राॅनगस्ताची आपबीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 01:20 PM2021-12-27T13:20:01+5:302021-12-27T13:20:46+5:30
औरंगाबादेतही दुर्लक्ष, पण स्वत:हून केली चाचणी
औरंगाबाद : ‘मी जर स्वत:हून कोरोना तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात गेलो नसतो, तर मी कोरोनाबाधित आणि नंतर ओमायक्राॅनबाधित (Omicron Variant ) आहे, हे समोर आलेच नसते. कारण दिल्लीतील विमानतळावर माझी तपासणी झाली नाही, ना औरंगाबादेत. मला ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन आहे, अशी भावना दुबईहून परतलेल्या ३३ वर्षीय ओमायक्राॅनग्रस्त रुग्णाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
या तरुणाला ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. कोरोनाचे उपचार घेऊन हा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होता. परंतु अहवाल प्राप्त होताच मनपाने त्यास उपचारासाठी पुन्हा भरती केले. ‘लोकमत’शी स्वत:हून संपर्क साधून हा रुग्ण म्हणाला, १७ डिसेंबरला दुबईहून दिल्लीत दाखल झालो. प्रवासापूर्वी ४८ तास आधीचा कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल होता. दिल्ली विमानतळावर केवळ ७ दिवसांचे क्वारंटाईन सांगण्यात आले, कोणतीही तपासणी झाली नाही. त्यानंतर शहरात दाखल झालो. येथेही विमानतळावर केवळ डोसची विचारणा करण्यात आली. घरी गेलो, पण थोडी सर्दी झालेली होती. कुटुंबीयांना काही त्रास नको, म्हणून १८ रोजी स्वत: एन-८ येथील केंद्रावर जाऊन कोरोना तपासणी केली. १९ तारखेला अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे खासगी रुग्णालयात भरती झालो. मी जर तपासणी केली नसती, तर हे समोर आलेच नसते. 'एचआरसीटी स्कोर' केवळ ३ होता. इतर तपासण्या नाॅर्मल आल्या. प्रकृती सुधारल्याने पाचव्या दिवशी सुटी झाली, असेही या रुग्णाने सांगितले.
निगेटिव्ह आल्याच्या दिवशीच ओमायक्राॅनचा अहवाल
२५ डिसेंबर रोजी खासगी लॅबमध्ये पुन्हा कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. परंतु याच दिवशी ओमायक्राॅनचा अहवाल आला. त्यावरून मला पुन्हा भरती केले. खासगी लॅबला शासनाने परवानगी दिलेली आहे. परंतु निगेटिव्ह असताना पुन्हा भरती का केले? मी जर इथे पाॅझिटिव्ह झालो तर त्याला कोण जबाबदार राहील? त्यामुळे रुग्णालयातून सुटी दिली पाहिजे, असे हा रुग्ण म्हणाला.
मी प्रामाणिक, पण...
होम आयसोलेशनमधून मी कुठेही बाहेर गेलो नाही. दुबईतील मित्र आणि आता कुटुंबीयदेखील निगेटिव्ह आलेले आहेत. मी प्रामाणिक आहे. त्यामुळे स्वत:हून तपासणी करून घेतली. कारण दुसऱ्या लाटेत कोरोना होऊन गेलेला आहे. तपासणीच्या दोन दिवसांनंतर मनपाचा फोन आला. परदेशातून आलेले किती लोक तपासणीविना शहरात फिरत आहेत, असा प्रश्न या तरुणाने उपस्थित केला. दिल्ली किंवा औरंगाबादेत विमानतळावरच तपासणी झाली असती तर मी थेट रुग्णालयात गेलो असतो, असेही तो म्हणाला.
...म्हणे कडेकोट बंदोबस्त..
रुग्ण कडेकोट बंदोबस्तात असल्याचे म्हटले जात आहे. रुग्ण आहे, एखादा गुन्हेगार नाही. त्यामुळे नागरिकांनी फार भीती बाळगू नये. लस घेतली पाहिजे, असेही हा तरुण म्हणाला.
परदेशातून आलेल्या प्रत्येकाची तपासणी
परदेशातून आलेल्या नागरिकांची यादी करण्यात आली आहे. प्रत्येकाला शोधून तपासण्यात येत आहेत. सदर ओमायक्राॅनगस्त तरुणाचा सोमवारी पुन्हा एकदा स्वॅब घेतला जाईल. त्याच्या कुटुंबातील तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांची ७ दिवसांनंतर पुन्हा एकदा तपासणी केली जाईल.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा