जिल्हा रुग्णालयात २ वर्षांपूर्वीच संपली अग्निरोधक यंत्रांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:03 AM2021-01-13T04:03:26+5:302021-01-13T04:03:26+5:30

औरंगाबाद : आग लागली तर त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निरोधक यंत्र महत्त्वाची भूमिका निभावते; पण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ...

The term of fire fighting equipment in the district hospital expired 2 years ago | जिल्हा रुग्णालयात २ वर्षांपूर्वीच संपली अग्निरोधक यंत्रांची मुदत

जिल्हा रुग्णालयात २ वर्षांपूर्वीच संपली अग्निरोधक यंत्रांची मुदत

googlenewsNext

औरंगाबाद : आग लागली तर त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निरोधक यंत्र महत्त्वाची भूमिका निभावते; पण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भिंतींवर दोन वर्षांपासून मुदतबाह्य अग्निरोधक यंत्रे लटकवलेली आहेत. त्यामुळे आगीची एखादी दुर्घटना घडली तर ही यंत्रे काम करतील, याची खात्री नाही. त्यातून अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत होत्याचे नव्हते होण्याचाच अधिक धोका आहे. मात्र, रुग्णांचे नशीब बलवत्तर म्हणावे की, गेली दोन वर्षे काही घडले नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयात गत वर्षभर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. शेकडो रुग्ण येथील उपचाराने कोरोनामुक्त झाले. त्यापूर्वी जून २०१८ पासून विविध आजारांचे रुग्ण येथील औषधोपचाराने रोगमुक्त झाले; पण रुग्णांना रुग्णालयात सुरक्षित वातावरण देण्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. दुर्घटना कधी सांगून होत नाही; पण त्याला तोंड देणारी यंत्रणा सक्षम पाहिजे; परंतु रुग्णालयात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निरोधक यंत्रे नावालाच ठेवण्यात आली आहेत. कारण त्यांची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपली आहे.

यंत्रे भरपूर, पण रिफिलिंगच नाही

जिल्हा रुग्णालयात ७९ यंत्रे आहेत. रुग्णालय प्रशासनाने १२ ऑक्टोबर २०२० रोजी रिफिलिंगसाठी एक लाख १० हजार रुपयांचे अंदाजपत्रक वरिष्ठ कार्यालयास दिले आहे; परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. भंडारा येथील दुर्घटनेनंतर जाग आल्यानंतर आता कुठे ही यंत्रे रिफिलिंगची तयारी सुरू करण्यात आली आहे.

प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष

रुग्णालयात नियमितपणे अग्निरोधक यंत्रे हाताळणीचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे; परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. जून २०१८ मध्ये रुग्णालयात मॉक ड्रील झालेले आहे; परंतु त्यानंतर काहीही झालेले नाही. प्रत्येक ६ महिने ते एक वर्षात प्रशिक्षण होणे गरजेचे आहे.

प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना हाताळणेच माहीत नाही

अग्निरोधक यंत्रे कशी हाताळावी, याचे साधारण दोन वर्षांपूर्वी प्रशिक्षण दिलेले आहे. त्यानंतर हे प्रशिक्षण झालेले नाही. त्यावेळीही अग्निरोधक यंत्र कसे चालवायचे, हे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळाली नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

----

माझे प्रशिक्षण झालेले आहे. मी गरजेप्रसंगी अग्निरोधक यंत्र हाताळू शकते, असा विश्वास आहे; परंतु सहकारी कर्मचारी ते किती हाताळू शकतात, हा मलाही पडलेला प्रश्न आहे. कारण दुर्घटनेच्या वेळी कोण कुठे असेल, काहीही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला प्रशिक्षण हवे.

रिफिलिंग प्रक्रिया सुरू

जिल्हा रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रांच्या रिफिलिंगसाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच अग्निरोधक यंत्रांचे रिफिलिंग होईल.

- डॉ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

फोटो ओळ..

जिल्हा रुग्णालयात भिंतींवर अडकवलेली मुदतबाह्य अग्निरोधक यंत्रे.

Web Title: The term of fire fighting equipment in the district hospital expired 2 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.