भांडणातच संपला सभापतींचा काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2016 11:35 PM2016-03-01T23:35:01+5:302016-03-01T23:48:10+5:30
हिंगोली : औंढा पंचायत समितीच्या सभापतींचा पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे सव्वावर्षाचा काळ केव्हाच संपला असल्याने राजेंद्र सांगळे यांनी राजीनामा दिला आहे.
हिंगोली : औंढा पंचायत समितीच्या सभापतींचा पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे सव्वावर्षाचा काळ केव्हाच संपला असल्याने राजेंद्र सांगळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. सेनेत अरुणा दराडे या एकमेव इच्छुक आहेत. मात्र कॉंग्रेसही फिल्डिंग लावण्यास सज्ज आहे. सांगळे यांच्या काळात त्यांचे व बीडीओंचे वाद चव्हाट्यावर आले होते. यातच त्यांचा कार्यकाळ गेला.
या पंचायत समितीत सदस्य अनिल देशमुख यांचे पद औंढा नगरपंचायत स्थापनेमुळे रद्द झाल्याने उपसभापतीपद अगोदरच रिक्त आहे. आता सभापतींनीही जि. प. अध्यक्षांकडे राजीनामा दिला. त्यामुळे नवीन सभापती निवडेपर्यंत जि. प. अध्यक्षा किंवा इतर कोण्यातरी सभापतींना तेथील पदभार द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रशासनाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सभापती-उपसभापती निवड होईल.
या पंचायत समितीत अगोदरच शिवसेनेला काठावरचे बहुमत होते. त्यातही एकाचे सदस्यत्व रद्द झाल्याने भाजपाचा सदस्य सोबत घेतल्याशिवाय बहुमत होत नाही. तो मागच्या वेळी शिवसेनेसोबत होता. आता कॉंग्रेस-राकॉंकडे आठ व शिवसेनेकडे आठ असे समान संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपाचा सदस्य जिकडे झुकेल, तिकडे बहुमताचा आकडा जाणार आहे. मागील काही दिवसांत वसमत, जवळा बाजार भागातील राजकीय वातावरण सहकारातील निवडणुकांमुळे ढवळून निघाले आहे. त्यात सेना-भाजपात फारसे सख्ख्य नव्हते. औंढा नगरपंचायतीत मात्र युतीचा धर्म पाळला गेला. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची फिल्डिंग कितपत यशस्वी ठरते, हे सांगणे अवघड आहे. राजेंद्र सांगळेही सभापतीपद सोडण्यास इच्छुक नव्हते. श्रेष्ठींच्या दबावापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. (प्रतिनिधी)