औरंगाबाद विमानतळावर टर्मिनल तयार, पण आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेची प्रतीक्षाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 12:26 PM2022-06-10T12:26:50+5:302022-06-10T12:27:57+5:30
सेवा सुरू होण्यासाठी अडथळे दूर होईना; जगभरात माल पाठविण्यासाठी मुंबई, दिल्लीवर मदार
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जगभरातील अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांत तयार झालेला एक तरी स्पेअर पार्ट आहे. याबरोबर इतर अनेक उत्पादनांची परदेशांत निर्यात होते. मात्र ही उत्पादने परदेशांत मुंबई, दिल्ली मार्गाने पाठविण्याची वेळ ओढवत आहे. कारण चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये ऑटोमोबाईल्स, कृषी, फार्मासह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या आहेत. वर्षभरात उत्पादनांतून सुमारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. येथील उत्पादनांना जगभरातून मागणी आहे. चिकलठाणा विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रुपांतर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच विमानतळावर ड्रग इन्स्पेक्टरची नियुक्ती झाली आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले की, ही नियुक्ती आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेसाठीच झाली आहे.
किमान एक हजार ट्रक रवाना
औरंगाबादेतील विविध उत्पादने दररोज किमान एक हजार ते १५०० ट्रकमधून देशभरातील विविध शहरांत जातात. ८० देशांमध्ये औद्योगिक मालाची निर्यात होते. यात वाहन, वाहनांचे सुटे भाग, औषधी, साॅफ्टवेअरसह इतर उत्पादनांचा समावेश आहे.
तीन हजार टन माल निर्यात
चिकलठाणा विमानतळावरून सध्या मुंबईमार्गे दरवर्षी दीड हजार टन माल निर्यात केला जातो. विमानतळावर आंतराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर दरवर्षी जवळपास तीन हजार टन माल निर्यात होईल, अशी अपेक्षा आहे.
वर्ष २०२१ मध्ये ७०६.२ टन मालाची वाहतूक
औरंगाबाद विमानतळावरून प्रवासी विमानातून सध्या देशांतर्गत कार्गो माल पाठविला जात आहे. वर्ष २०२१ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत औरंगाबादहून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नईला तब्बल ७०६.२ टन कार्गो पाठविण्यात आल्या.
औषधी, फूड, कृषी उत्पनांची निर्यात शक्य
औषधी, फूड, भाजीपाला, फुले यांची आंतरराष्ट्रीय कार्गोद्वारे निर्यात होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषी उत्पनांच्या निर्यातीसाठी योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे. विमानांची संख्या वाढल्यानंतर कार्गो सेवा वाढीला मदत होईल.
-मुकुंद कुलकर्णी, उद्योजक
औरंगाबादेतील उद्योग कंपन्या-२५००
फार्म कंपनी- ६०