भयंकर! पाडळी शिवारात ४० वर्षीय व्यक्तीचे फक्त धड सापडले, मुंडके गायब!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 07:31 PM2023-01-20T19:31:56+5:302023-01-20T19:32:53+5:30
आज दिवसभर पोलिसांनी मृताचे शिर शोधले; परंतु ते सापडले नाही.
बिडकीन (औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील पाडळी येथील एका ४० वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी खून झाला असून शुक्रवारी त्याचे शरीर पोलिसांना गाव शिवारातील एका शेतात सापडले; परंतु शिर सापडले नसल्याचे दिवसभर पोलिसांनी याचा शोध घेतला. मात्र त्यांच्या हाती निराशाच आली.
पाडळी येथील संदीप संपत गायकवाड हा व्यक्ती गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर निघून गेला होता. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याचे शिर नसलेले शरीर गाव शिवारातील एका गायरान शेतामध्ये काही शेतकऱ्यांना आढळले. याबाबत बिडकीन पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सपोनि संतोष माने, उपनि जगदीश मोरे, महेश घुगे, बीट जमादार संजीवन कदम, शरद पवार, सचिन म्हस्के आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचारण करण्यात आले. काही वेळानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक रामा जाधव, वाल्मीक निकम, खांदेभराड आदी दाखल झाले.
शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी मयताचे शिर शोधले; परंतु ते सापडले नाही. यावेळी पोलीस मयताचे शरीर ग्रामीण रूग्णालयात आणत असताना त्यास मयताच्या नातेवाईकांनी विरोध केला. आगोदर आरोपींना अटक करा, मगच मृतदेह उचला असा आक्रमक पवित्रा घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृतदेह बिडकीन ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
मयतावर विविध गुन्हे
मयत संदीप गायकवाड हा परिवारासह पाडळी येथे राहत होता. त्याला १६ वर्षाचा एक मुलगा व एक लहान मुलगा आहे. मात्र सद्यस्थितीत तो पत्नीसोबत राहत नसल्याचे समजते. त्याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंग असे गुन्हे दाखल असून पूर्व वैमान्यासातून ही घटना घडली असावी, असा आरोप नातेवाईक करीत आहेत. पाडळी येथे दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे.
एका संशयितास घेतले ताब्यात
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.