अवकाळी फटक्याने औरंगाबाद जिल्ह्यात दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:41 AM2018-04-17T01:41:21+5:302018-04-17T01:41:59+5:30
जामगावात केळीची बाग उद्ध्वस्त : दौलताबाद परिसरात १ तास जोरदार पाऊस; धामणगाव येथे वीज पडून गाय ठार
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली. गंगापूर तालुक्यातील जामगाव परिसरात शेतक-याच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाला, तर फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे वीज पडून गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दौलताबाद परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने वीट उद्योगाला मोठा फटका बसला, तर जिल्ह्यात इतर ठिकाणीही वादळी पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली.
गंगापुरात केळी, कांदा पिकाचे नुकसान
गंगापूर : सोमवारी ५ वाजेच्या सुमारास सायंकाळी गंगापूर तालुक्यात काही ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तर कांदा पीक, वीट उद्योगालाही याचा फटका बसला.
तालुक्यातील जामगाव मार्गावरील गंगापूर शिवारात मारुती धनायत यांच्या शेतातील केळीची बाग वादळी वाºयामुळे उद्ध्वस्त झाली. यामुळे धनायत यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी सदर शेतकºयाने केली आहे.
गंगापूर शहरात पावसामुळे १० मिनिटांत सर्वत्र पाणीचपाणी साचले होते, तर ग्रामीण भागात वादळी वाºयाने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसाने वीट उत्पादक व कांदा उत्पादक शेतकºयांची धावपळ झाली. दरम्यान, वादळी वारा व विजेचा कडकडात यामुळे गंगापूर शहरातील वीज गुल झाली होती. रात्री उशिरापर्यंत गंगापूर अंधारातच होते.
दौलताबाद परिसरात एक तास हजेरी
दौलताबाद : परिसरात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जवळपास एक तास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकºयांच्या पिकांसह वीट उद्योगाला मोठा फटका बसला.
दौलताबादसह माळीवाडा, फतियाबाद, रामपुरी, केसापुरी, केसापुरी तांडा, शरणापूर, वंजारवाडी येथे दुपारच्या वेळेस अडीच वाजेच्या सुमारास चोहोबाजूंनी काळे ढग जमा झाले. ३ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच शेतकºयांच्या पिकांचेही नुकसान झाले.
गायीचा मृत्यू; शेतकºयाचे नुकसान
जातेगाव : फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे सोमवारी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पाऊस झाला. यावेळी वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला.
सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास धामणगाव परिसरात वादळी वाºयासह पाऊस झाला. यावेळी वीज पडून शेतकरी एकनाथ गंगाधर डिडोरे यांच्या गट नं. १९१ शेतातील गायीचा जागेवरच मृत्यू झाला. यामुळे शेतकºयाचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, धामणगावसह वाघोळा, नांद्रा, जातेगाव, बाभूळगाव, पिंपळगाव येथेही पावसाच्या सरी कोसळल्या.
पीरबावडा परिसरात हजेरी
पीरबावडा : परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजता पावसाने हजेरी लावली.
परिसरात जवळपास अर्धा तास पाऊस सुरू होता. यामुळे शेतकºयांसह नागरिकांची एकच धांदल उडाली. पावसामुळे टँकरवर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांची पंचाईत झाली.
तुर्काबाद-खराडी परिसराला फटका
लिंबेजळगाव : तुर्काबाद-खराडी व अंबेलोहळ परिसरात सोमवारी सायंकाळी ५ वाजता जोरदार वाºयासह पाऊस पडला. तुर्काबाद-खराडीसह अंबेलोहळ परिसरातील टोकी येथे सोमवारी झालेल्या पावसामुळे कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले. तसेच परिसरातील वीटभट्टी उद्योगाला या पावसाचा फटका बसला. दरम्यान, कडक उन्हामुळे उकाडा सहन करणाºया नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला.
लाडसावंगीत सरी कोसळल्या
लाडसावंगी : येथे सोमवारी दुपारी २ वाजता पावसाने काही वेळ हजेरी लावली. कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. भर उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने शेतकºयांची पिके, चारा वाचविण्यासाठी एकच धावपळ उडाली.