दामिनी पोलीस पथकाबद्दल तरुण वर्गात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:44 PM2019-09-21T18:44:40+5:302019-09-21T18:48:24+5:30
तरुण मुला- मुलींना एकटे पाहून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा प्रकार
औरंगाबाद : महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेमण्यात आलेल्या दामिनी पथकाची सध्या तरुण वर्गात दहशत वाढली आहे. तरुण मुला- मुलींना एकटे पाहून त्यांच्याकडून पैसे लुटण्याच्या आमिषाने हे पथक मुला- मुलींना पकडते व त्यांच्याकडे पैशाची मागणी करते. हा अनुभव आता नवीन राहिला नाही.
शहरातील विविध पर्यटनस्थळी दामिनी पथकाच्या गाड्या बघायला मिळतात. दामिनी पथक हे महिलांच्या सुरक्षेसाठी आहे. मुलगा आणि मुलगी दोघे एकटे दिसले की, त्यांना वाईट- साईट बोलले जाते. धमकावले जाते. अनेकदा महिला रक्षकांकडून शिवीगाळ केली जाते. मुलगा-मुलगी प्रेमीयुगुल असो की मित्र-मैत्रिणी, त्यांचा खालच्या भाषेत उद्धार केला जातो. घाबरलेल्या तरुणांकडे हे रक्षक पैशाची मागणी करतात. मोबाईल जप्त करतात. मुलगा- मुलगी रस्त्याने बोलत जात असले तरी हे पथक त्यांना त्रास देते. विशेषत: विद्यापीठ परिसरात हा त्रास वाढला आहे.
यासंदर्भात सत्यजित मस्के, पल्लवी बोरडकर, अन्वय गायकवाड, योगेश बहादुरे, भगवान श्रावणे व आकाश गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. सत्यजित मस्के म्हणाला, समाजाला सुरक्षा देण्यासाठी निर्माण झालेल्या पोलीस यंत्रणेचा एक भाग असलेल्या दामिनी पथकाकडून विद्यापीठ परिसरात गस्त घालत असताना नाहक त्रास देण्यात येत आहे. विनाकारण दमदाटी केली जात आहे. या पथकाची तक्रार आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. मनस्ताप देण्याचे काम या पथकाकडून होत आहे.
मुलींसोबत होणारी छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना झालेली आहे. परंतु छेडछाड, मित्र-मैत्रिणी, बहीण-भाऊ यांच्यातील फरक दामिनी पथकाला समजायला हवा. विद्यापीठ आवारात सातच्या नंतर मुले- मुली गप्पा मारीत असतील तर त्यांना अडविण्याची काय गरज, असा सवाल पल्लवी बोरडकर या मुलीने विचारला आहे. व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा घालण्याचे काम दामिनी पथकाकडून होत आहे. मुला- मुलींना उठाबशा काढायला लावणे, पैशाची मागणी करणे, घाबरवून सोडणे हे प्रकार वाढलेले आहेत. याला वेळीच आळा घालण्याची मागणी अन्वय गायकवाड याने केली आहे. दामिनी पथकाची गरज आहे. परंतु बऱ्याचदा केवळ संशय म्हणून मुला-मुलींना अडवलं जातं व मानसिक त्रास देण्याची भूमिका घेतली जाते, हे चुकीचे आहे, असे योगेश बहादुरे यांचे म्हणणे पडले. भगवान श्रावणे व आकाश गायकवाड हेही दामिनी पथक व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करीत असल्याचा आरोप केला आहे.