टेस्लाची कर्नाटकमध्ये गुंतवणूक नाही; महाराष्ट्रात येण्याबाबत सरकार आशावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 16:05 IST2021-01-27T16:02:40+5:302021-01-27T16:05:57+5:30
Tesla investment in India टेस्लाचे मुख्य इलन मास्क यांनी भारतात गुंतवणुकीची घोषणा केली. त्यानंतर मी आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.

टेस्लाची कर्नाटकमध्ये गुंतवणूक नाही; महाराष्ट्रात येण्याबाबत सरकार आशावादी
औरंगाबाद : साउथ आफ्रिकेतील टेस्ला मोटार्स कंपनीने काही महिन्यांपूर्वी भारतात गुंतवणुकीची घोषणा केली. गेल्या आठवड्यात सदरील कंपनी कर्नाटकमध्ये गुंतवणूक करीत असल्याचे वृत्त आले. परंतु ती कंपनी कर्नाटकमध्ये गेली नसून महाराष्ट्रात गुंतवणूक करील, असा आशावाद उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, टेस्लाबाबत गैरसमज झालेला आहे. विदेशी गुंतवणुकीबाबत एक किंवा दोन असे उत्तर नसते. त्यात अनेक पैलू असतात. टेस्लाचे मुख्य इलन मास्क यांनी भारतात गुंतवणुकीची घोषणा केली. त्यानंतर मी आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. भारतात येण्याच्या पर्यायात त्यांनी महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचे नमूद केले आहे. राज्यात औद्योगिक इको सिस्टीम आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा प्राधान्याने येथेच विचार होईल. असे टेस्लाच्या टीमने सांगितले होते. कर्नाटकात उद्योग गेलेला नाही. अमेरिका व इतर देशात उत्पादित केलेल्या मोटारी कर्नाटकात पाठवून बंगळुरू येथील काही उद्योगसमूहाशी विक्रीसाठी त्यांनी चाचपणी सुरू केली आहे, उत्पादन सुरू केलेले नाही. कारचे मॉडेल, विक्री, बाजारपेठ याबाबत ते विचार करीत असावेत. ज्या कारला प्रतिसाद मिळेल, त्याचे उत्पादन होईल. त्यामुळे राज्य सरकार आशावादी नसून खात्री आहे, की टेस्लाची गुंतवणूक येथे होईल.
औरंगाबादचा पर्याय समोर ठेवू
टेस्लासाठी राज्यात कुठेही जागा ठरविलेली नाही. ते भारतात कुठेही निर्णय घेतील. राज्यात येण्याचा निर्णय घेतला तर निश्चित पालकमंत्री, उद्योगमंत्री म्हणून औरंगाबाद पर्याय म्हणून त्यांच्यासमोर ठेवील. येथील उद्योग-रोजगार वाढीसाठी पालकमंत्री म्हणून तेवढा विचार तर निश्चित आहे. उद्योगवाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तीन टप्प्यांत सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले. त्यात मराठवाड्यासह औरंगाबादमध्ये करार केले. आता १६० कोटींचे नवीन करार केले आहेत. यातून रोजगार वाढणार आहे.