दहा हजार रुपयांची रक्ताच्या कर्करोगाची चाचणी स्वस्तात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:24 AM2017-12-11T00:24:04+5:302017-12-11T00:24:17+5:30
खाजगी लॅबमध्ये ३ ते १० हजार रुपये मोजून करावी लागणारी रक्ताच्या कर्करोगाची चाचणी आता स्वस्तात करता येणे शक्य होणार आहे. ही चाचणी करणारे तब्बल ८० लाखांचे यंत्र घाटी रुग्णालयात दाखल झाले असून, या यंत्राचे रविवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खाजगी लॅबमध्ये ३ ते १० हजार रुपये मोजून करावी लागणारी रक्ताच्या कर्करोगाची चाचणी आता स्वस्तात करता येणे शक्य होणार आहे. ही चाचणी करणारे तब्बल ८० लाखांचे यंत्र घाटी रुग्णालयात दाखल झाले असून, या यंत्राचे रविवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले.
घाटीत विकृतीशास्त्र विभाग व मेडिकल रिसर्च सोसायटी यांच्या वतीने रविवारी महाविद्यालयातील महात्मा गांधी सभागृहात ‘रक्ताचा कर्करोग’ या विषयावर कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी डॉ. बारपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, विभागप्रमुख डॉ. आर.एस. बिंदू, डॉ. ए.आर. जोशी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या उद््घाटनानंतर रक्ताच्या कर्करोगाच्या चाचणीसाठी प्राप्त झालेल्या फ्लोसायटोमीटर या ८० लाखांच्या यंत्राचे उद््घाटन झाले.
यावेळी डॉ. बारपांडे म्हणाले की, अत्याधुनिक यंत्रसामग्री रुग्णांवरील उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात; परंतु यंत्रांचा आधार घेऊन निदान करण्यासह डॉक्टरांनी वैद्यकीय उपचारातील ज्ञान वाढविण्यावरही भर द्यावा. केवळ यंत्रांवर अवलंबून राहू नये. या यंत्रांचा रुग्णांच्या उपचारासाठी अधिकाधिक फायदा होईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. वर्षा रोटे, डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. भारत सोनवणे, डॉ. आर.एस. बिंदू यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत २०० पेक्षा अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन डॉ. मंजूषा ढवळे यांनी केले. डॉ. शुभज्योती पोरे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी डॉ. सुनीता पाटील, डॉ. प्रगती फुलगीरकर, डॉ. अंजली कुलकर्णी यांच्यासह विकृतीशास्त्र विभागातील अधिकारी-कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
मराठवाड्यात पहिले उपकरण
आतापर्यंत रक्ताच्या कर्करोगाच्या निदानाची चाचणी मुंबईला करावी लागत होती. त्यासाठी दहा हजारांपर्यंतची रक्कम लागते. घाटीत आठवड्याला किमान दहा ते बारा रुग्णांची चाचणी करावी लागते. मराठवाड्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळणारे हे पहिले उपकरण आहे. या उपकरणामुळे ही चाचणी आता घाटीत होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले. या उपकरणामुळे मोठी सुविधा झाल्याचे विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आर.एस. बिंदू म्हणाले.