पॅनलप्रमुखांची सरपंच निवडीपर्यंत कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:05 AM2021-01-25T04:05:31+5:302021-01-25T04:05:31+5:30
फुलंब्री : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. तरी देखील खरी परीक्षा सरपंचपदासाठी राहणार आहे. ...
फुलंब्री : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. तरी देखील खरी परीक्षा सरपंचपदासाठी राहणार आहे. काठावर बहुमत असलेल्या ठिकाणी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पॅनल प्रमुख गावातच आपल्या सदस्यावर नजर ठेवून आहेत.
तालुक्यात झालेल्या निवडणुकीत अनेक मातब्बर पडले. तर काही ठिकाणी नव्याने संधी मिळाली तर अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले आहेत. या निवडणुकीचे ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघालेले आहे. जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीपेक्षा देखील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची ठरली आहे. याची प्रचिती अनेकांना आली आहे. फुलंब्री तालुक्यात एकूण ४९ ग्रामपंचायतींकरिता निवडणुका झाल्या. अनेक गावाच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. ९ सदस्य असलेल्या ठिकाणी एका पॅनलला पाच तर दुसऱ्या पॅनलला चार जागी विजय झाला आहे. अशा सर्वच ठिकाणी एका मतासाठी चांगलीच चुरस लागणार आहे. सरपंचपद मिळविण्यासाठी विरोधी पॅनलमधील केवळ एका सदस्यांना आपल्याकडे वळविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत पॅनल प्रमुखांची कसोटी लागलेली आहे. आपले सदस्य सांभाळून ठेवण्याकरिता परिश्रम घ्यावे लागत आहेत.
आरक्षण सोडत पर्यंत सदस्य गावातच
सरपंचपदाचे आरक्षण २९ जानेवारीला होणार आहे. यात मागील वेळा काढलेल्या आरक्षणाची पुनरावृत्ती होते की नवे आरक्षण निघते. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सरपंचपदासाठी आरक्षण निघत नाही तो पर्यंत निवडून आलेले सदस्य गावातच राहणार आहेत. आरक्षण निघाले की सरपंचपदाचे सदस्य हे सहलीवर जातील असे अनेक ठिकाणच्या पॅनल प्रमुखांकडून सांगण्यात आले.
-----------------
पक्षाचा असलो तरी मी त्यांना शब्द दिलाय
काठावर असलेल्या बहुमताच्या ठिकाणी सदस्य फोडाफोडीसाठी फिल्डिंग लावली जात असून यात वरिष्ठ राजकीय पुढारी हस्तक्षेप करीत असल्याची माहिती मिळत आहे. मी आपल्या पक्षाचा असलो तरी समोरच्या पॅनलमधून निवडून आलेलो आहे. त्यांना शब्द दिला असल्याने मी तुमच्याकडे येऊ शकणार नाही असे सदस्य सांगताना दिसून येतात.