चोख बंदोबस्तात टीईटीची परीक्षा
By Admin | Published: June 7, 2016 11:42 PM2016-06-07T23:42:51+5:302016-06-07T23:48:26+5:30
औरंगाबाद : शहरातील २७ केंद्रांवर अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. या परीक्षेसाठी ८ हजार ९७५ उमेदवार प्रविष्ट झाले होते.
औरंगाबाद : शहरातील २७ केंद्रांवर अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. या परीक्षेसाठी ८ हजार ९७५ उमेदवार प्रविष्ट झाले होते. मात्र, आज प्रत्यक्षात ६ हजार ५५२ उमेदवारांनी परीक्षा दिली. तब्बल २ हजार ३२३ उमेदवारांनी या परीक्षेकडे पाठ फिरवली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १६ जानेवारी रोजी राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली होती. त्यावेळी प्राथमिक शाळेसाठी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा सकाळच्या सत्रातला पेपर फुटला होता. शिक्षण विभागाने त्यामुळे तो पेपर रद्द केला होता. मंगळवारी ७ जून रोजी फुटलेल्या पेपरची फेर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी शहरात २७ परीक्षा केंद्रांवर २७ बैठे पथकांची बारीक नजर होती. ७ क्षेत्रीय अधिकारी आणि पोलिसांच्या निगराणीत कोषागारे कार्यालयातून सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास प्रश्नपत्रिकांच्या पेट्या बाहेर काढण्यात आल्या. पोलीस बंदोबस्तातच प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सर्व परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले. एकूण ३६० कक्षांमध्ये ७४.१२ टक्के उमेदवारांनी ही परीक्षा दिली. यावेळी प्रत्येक कक्षावर १ याप्रमाणे ३६० समवेक्षक आणि ५ परीक्षा कक्षांसाठी १ या प्रमाणे ७२ पर्यवेक्षकांनी परीक्षेसाठी परिश्रम घेतले.
परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी सांगितले.
फेरपरीक्षा...
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी सांगितले की, १६ जानेवारी रोजी पहिला पेपर फुटला होता. तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रद्द करून आज मंगळवारी ७ जून रोजी त्यासंबंधीची फेरपरीक्षा घेतली. सर्व केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त, बैठे पथके, पर्यवेक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी लक्ष ठेवून होते.