TET Exam Racket: 'पात्र शिक्षक' होण्यासाठी द्यावे लागत होते दीड ते तीन लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 11:57 AM2021-12-18T11:57:04+5:302021-12-18T11:59:23+5:30
म्हाडा परीक्षेचा पेपर फोडणारा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेतील हॉल तिकीट पुणे सायबर पोलिसांना सापडले होते.
- राम शिनगारे
औरंगाबाद : आरोग्य (Health Dept Exam Paper Leak ), म्हाडा ( MHADA Exam Paper Leak ) विभागाच्या भरतीमधील घोटाळ्यापाठोपाठ शिक्षक होण्यासाठी आवश्यक शिक्षक पात्रता परीक्षेतही (टीईटी) गैरप्रकार ( TET Exam Racket ) झाल्याचे उघडकीस आले. औरंगाबाद, बीड, जालना, लातूरसह इतर जिल्ह्यांत टीईटी परीक्षा ( TET Exam ) उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी १.५ ते ३ लाख रुपयांपर्यंत रक्कम मोजल्याची धक्कादायक माहिती शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
म्हाडा परीक्षेचा पेपर फोडणारा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेतील हॉल तिकीट पुणे सायबर पोलिसांना सापडले होते. या प्रकरणात पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्यामुळे शालेय शिक्षण विभागात खळबळ उडाली. पूर्वी दबक्या आवाजात बोलणारे आता उघड बोलू लागले आहेत. एका शाळेतील शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या टीईटी परीक्षेच्या अगोदर परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणांवर एजंट फिरत होते. जो शिक्षक विनाअनुदानित तत्त्वावर नोकरीला कार्यरत आहे, त्यांच्याकडून तीन लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळण्यात येत होती. जे परीक्षार्थी शिक्षक म्हणून कार्यरत नाहीत, त्यांच्याकडून दीड लाखापासून ते अडीच लाख रुपयांपर्यंत पैसे मागण्यात येत होते. राज्य शासनाने इतर नोकरभरतीसोबत शिक्षक भरतीलाही परवानगी देण्याची घोषणा केल्यामुळे टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी अनेकांच्या उड्या पडल्या होत्या. त्यामुळे पैसे देऊन टीईटी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या हजाराच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले.
नवख्यांचा अधिक भरणा
टीईटी परीक्षेला अर्ज केलेल्या उमेदवारांकडे उत्तीर्ण होण्यासाठी सेंटिंग लावून देणाऱ्यांमध्ये नवख्यांचा भरणा अधिक होता. त्यात क्लासेस चालकांचे एजंट होते. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विविध ठिकाणी शिकवणी लावण्यात आलेली होती. त्याठिकाणीच उमेदवारांना हेरून पैशासाठी राजी करण्यात येत होते, अशीही माहिती चौकशीत समोर आली आहे.
औरंगाबादेतूनच हलत होते सूत्र
टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून देणाऱ्यांचे नेटवर्क औरंगाबाद येथूनच उर्वरित मराठवाड्यात कार्यरत होते. त्यासाठी काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
न्यायालयाच्या आदेशाने अनेकांची धांदल
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २३ (१) तरतुदीनुसार टीईटी उत्तीर्ण उमेदवारच शिक्षक होण्यासाठी पात्र आहेत. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने १२ फेब्रुवारी २०१३ रोजी शिक्षक होण्यासाठी टीईटी अनिवार्य केली होती. त्याची अंमलबजावणी मात्र करण्यात आली नाही. केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यात २०१७ मध्ये दुरुस्ती केल्यानंतर राज्य शासनाने टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी नोकरीतील शिक्षकांना ३१ मार्च २०१९ ची डेडलाईन दिली होती. या मुदतीत सर्व शाळांमधील २५ हजारांपेक्षा जास्त शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. २०१६ पर्यंत टीईटी उत्तीर्ण नसलेल्या अपात्र शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येत होत्या. त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वेळा राज्य शासनाने मुदतवाढ दिली होती. तरीही मोठ्या संख्येने शिक्षक उत्तीर्ण झाले नाहीत. त्यांच्या सेवा खंडित करण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांनी ८९ याचिका दाखल केल्या होत्या. त्या याचिका न्यायालयाने निकाली काढत दिलासा दिला नाही, त्यामुळे अनेकांची धांदल उडाली होती. यातील अनेक शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा दावा डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केला आहे.
...तर अनेकांची नावे देऊत
टीईटी परीक्षेत गैरव्यवहार होत असल्याचे बेरोजगार युवकांच्या संघटनेने अनेक वेळा राज्य शासनाचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. नाेकरीतील किती शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले, याचा डेटा अनेक वेळा मागण्यात आला. मात्र, तो देण्यात आला नाही. तेव्हाच काही लोक टीईटी उत्तीर्ण होण्यासाठीचे रॅकेट चालवत असल्याची कुजबुज कानी आली होती. पोलिसांनी विचारले तर त्यांची नावे देऊ.
-संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशन