माझ्या पाठीशी ठाकरे ब्रॅंड, औरंगाबाद पश्चिममध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत: राजू शिंदे
By बापू सोळुंके | Published: November 13, 2024 07:35 PM2024-11-13T19:35:24+5:302024-11-13T19:36:24+5:30
गद्दारांना पराभूत करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे: राजू शिंदे
छत्रपती संभाजीनगर : पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार ‘अनिवासी’ आमदाराला कंटाळले आहेत. मागील निवडणुकीत आपण अपक्ष होतो, तरीही जनतेने भरभरून मते दिली. आता ठाकरे ब्रॅंड माझ्या पाठीशी आहे. शिवाय गद्दारांना पराभूत करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे, कारण ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे असा, दावा उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी केला.
प्रश्न - तुम्ही दोन वेळा या मतदारसंघात पराभूत झालात. आता विजय मिळेल, असे का वाटते?
उत्तर - शंभर नाही, एक हजार टक्के मतदार आपल्याला संधी देतील, असा विश्वास आहे. कारण, मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार होतो, तरीही ४३ हजार मते मिळाली होती. आता मी मूळ शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही माझ्यासोबत आहे. शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना धडा शिकविण्यासाठी चंग बांधला आहे.
प्रश्न - तुम्ही भाजपमधून येऊन उमेदवारी मिळवली, त्यामुळे उद्धवसेनेतील इच्छुकांची नाराजी भोवणार नाही का?
उत्तर - आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रात्रंदिवस माझ्यासोबत काम करीत आहेत. शिरसाट यांना चांगला पर्याय मिळाल्याने त्यांच्यात उत्साह संचारला आहे.
प्रश्न - तुम्ही बाहेरचे उमेदवार असल्याचा आरोप होतोय?
उत्तर - मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. मुंबईचा नाही. आमदार शिरसाट यांना मतदारसंघातील दहा लोकांची नावे अचूकपणे सांगून दाखवावी, असे आपले त्यांना आव्हान आहे. कारण, ते ‘अनिवासी’ आहेत. त्यांचा जनतेशी संपर्क तुटलेला आहे.
प्रश्न - लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिंदेसेनेला मताधिक्य मिळाले होते, ते कसे वळविणार?
उत्तर - लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा भुमरे साहेबांना लाभ झाला होता. या निवडणुकीत मात्र तसे होणार नाही, कारण आमच्या पक्षाची एकगठ्ठा मते तर मिळणारच आहे. शिवाय, भाजपचा मोठा गट आपल्यासोबत आहे. जरांगे फॅक्टरही आपल्या बाजूने आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मते आपल्याला मिळतील. यामुळे या निवडणुकीत दीड लाखाहून अधिक मते घेऊन विजयी होऊ.
प्रश्न - आमदार संजय शिरसाट विकास कामांवर मते मागत आहेत, तुम्ही कशावर मागत आहात?
उत्तर - शिरसाट यांनी स्वत:चा आणि कुटुंबाचा विकास केला, त्यांनी पंधरा वर्षांत कसला विकास केला? असा माझा त्यांना सवाल आहे, कारण सातारा, देवळाईत आजही ७० टक्के ड्रेनेज आणि रस्ते झाले नाही. नगरनाका ते दौलताबाद रस्ता चौपदरीकरण केला नाही, बजाजनगरात गुन्हेगारी वाढलेली आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही.