ठाकरे-गांधी घराणी सारखीच, दोन्ही घराण्यांनी एकमेकांचा सन्मानच केला - नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 07:21 AM2021-06-12T07:21:52+5:302021-06-12T07:22:23+5:30

Nitin Raut : या वेळी राऊत यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना विविध विषयांवर आपले मत परखडपणे मांडले. सुरुवातीला राजेंद्र दर्डा यांनी नितीन राऊत यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Like the Thackeray-Gandhi family, both families respected each other - Nitin Raut | ठाकरे-गांधी घराणी सारखीच, दोन्ही घराण्यांनी एकमेकांचा सन्मानच केला - नितीन राऊत

ठाकरे-गांधी घराणी सारखीच, दोन्ही घराण्यांनी एकमेकांचा सन्मानच केला - नितीन राऊत

googlenewsNext

औरंगाबाद : गांधी आणि ठाकरे घराणी ही सारखीच आहेत. दोन्ही घराण्यांनी एकमेकांचा सन्मानच केला, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज येथे व्यक्त केले. राऊत यांनी ‘लोकमत भवन’मध्ये एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी राऊत यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना विविध विषयांवर आपले मत परखडपणे मांडले. सुरुवातीला राजेंद्र दर्डा यांनी नितीन राऊत यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राज्यात महाआघाडीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे सरकार चालवित असताना आणि शिवसेनेसोबत काम करताना काँग्रेसमधील मंत्र्यांना आपल्या धोरणांना मुरड घालावी लागते का, या प्रश्नावर राऊत म्हणाले की, काँग्रेस हा नेहमी दलित, मागासवर्गीय आणि वंचित घटकांच्या सन्मानाची गोष्ट करणारा पक्ष आहे. सरकारमध्ये आम्ही तिन्ही पक्षांनी ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ ठरवला आहे. त्यातून सरकार व्यवस्थित चालू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतोय. 

राज्यात सध्या प्रत्येक मंत्री हा पर्यायी मुख्यमंत्री असल्याप्रमाणे काम करत असल्याचे दिसते. कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत मंत्र्यांंना कुणी सांगत नाही का, या प्रश्नावर ऊर्जामंत्री असलेल्या राऊत यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले. ऊर्जेचे प्रतीक आहे हनुमान आणि हनुमान जेव्हा आपली शेपटी उंचावून दोन पाय रोवून उभा असतो, त्यावेळी त्याला हलवायची कुणात हिंमत नाही. त्या अर्थाने आमचा प्रत्येक मंत्री हा हनुमान आहे.

नितीन राऊत सध्या ज्या विषयावर सरकारमध्ये भांडत आहेत. त्या पदोन्नतीमधील आरक्षणाबद्दल आपण तलवार म्यान केली आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, पदोन्नतीमधील आरक्षण नाकारण्याला माझा विरोध कायम आहे. यासंदर्भात आता न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. यासंदर्भात सुनावणीपूर्वी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. तो न्यायालयाचा अवमान ठरेल.

ऊर्जा क्षेत्रासमोरील नवीन आव्हानाबाबत राऊत यांनी सांगितले की, राज्यातील ऊर्जा क्षेत्राची २००३मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. यामध्ये महावितरण ही सर्वांत मोठी कंपनी आहे. त्याचे तीन कोटी ग्राहक आहेत. कंपन्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी एक वर्किंग ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपने गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील विजेचा अभ्यास केला आहे. लवकरच त्याचा अहवाल सादर होईल. त्यानंतर नवीन उपाययोजना होतील.

नितीन राऊत को गुस्सा क्यूँ आता है?
नितीन राऊत को गुस्सा क्यूँ आता है? हा प्रश्न राजेंद्र दर्डा यांनी विचारला आणि त्याचे अगदी शांतपणे परंतु मनातील खदखद व्यक्त करणारे उत्तर राऊत यांनी दिले. वर्तमान ऊर्जामंत्री माजी ऊर्जामंत्र्यांना उत्तर देत आहेत, असे सांगत राऊत म्हणाले की, ज्या गोष्टी समाजाच्या हिताविरोधात आहेत, जिथे सामाजिक अन्याय होत आहे, तिथे माझा राग अनावर होतो. जिथे समाजाचा, विकासाचा, शिक्षणाचा, रोजगाराचा किंवा धार्मिक बाबींचा प्रश्न येतो, तिथे मी भांडतो. एखाद्या समाजाला, व्यक्तीला किंवा धार्मिक व्यक्तीला दुखावण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी माझा संताप अनावर होतो आणि त्याचे रागात रूपांतर होते.

वैचारिक मतभेद, मात्र मनभेद नाही
भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आले. गांधी व ठाकरे घराण्यात वैचारिक मतभेद आहेत. मात्र, मनभेद नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व केले. दोन्ही घराण्यांनी एकमेकांच्या सन्मानाचेच धोरण ठेवले. आताही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेच सन्मानाचे धोरण ठेवले आहे.     - नितीन राऊत, ऊर्जामंत्री 

Web Title: Like the Thackeray-Gandhi family, both families respected each other - Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.