ठाकरेंनी पाहिले, शिंदे आले; शेतक-यांना काही नाही मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:00 AM2017-11-24T00:00:50+5:302017-11-24T00:01:18+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गात ज्या शेतक-यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, त्यातून शेतकºयांच्या नशिबी खूप पडत नसून, उलट बांधाबांधावर मोबदल्यावरून प्रशासनाने भेदभाव सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गात ज्या शेतक-यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, त्यातून शेतकºयांच्या नशिबी खूप पडत नसून, उलट बांधाबांधावर मोबदल्यावरून प्रशासनाने भेदभाव सुरू केला आहे. फतियाबाद येथील एका जमिनीला ९२ लाख रुपये एकरी भाव मिळत आहे, तर दुसरीकडे बांधाच्या पलीकडील जमिनीला १२ लाख रुपये एकरी भाव दिला जात आहे.
या भेदभावामुळे आणि तालुक्यांच्या हद्दीमुळे निर्माण झालेल्या तंट्यावरून शेतकºयांना गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनीही विनापरवानगी सभागृहात प्रवेश केल्यामुळे शेतकºयांवरच राग काढला. पालकमंत्री शेतकºयांना म्हणाले की, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे येऊन गेले. आणखी काय पाहिजे. त्यामुळे हवालदिल शेतकºयांना नाना पळसकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात ठिय्या देत त्यांची वाट पाहण्यापलीकडे काहीही करता आले नाही. सभागृहातून बाहेर आल्यानंतर पालकमंत्री कदम यांनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण देत जिल्हाधिकारी कार्यालय सोडले.
बाळू हेकडे, काशीनाथ हेकडे, शिवाजी भगत, धरमसिंग सुंदर्डे, कोंडिराम पल्हाळ यांनी फतियाबाद, माळीवाडा, दौलताबाद येथील जमिनींबाबत दरांमध्ये सुरू असलेला घोळ समोर आणला. दोन्ही बाजूंनी शेतकºयांची कोंडी होत आहे. ७० टक्के भूसंपादन जर प्रशासनाने केले, तर उर्वरित जमीन कायद्याने संपादित करून शेतकºयांना ठरविलेला मोबदलाच देईल. यामध्ये शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.
गुंतवणूकदारांच्या जमिनींना भाव
समृद्धी महामार्गाची घोषणा होण्यापूर्वी वर्ष, सहा महिने आधी ज्या गुंतवणूकदारांनी कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या, त्यांना भूसंपादनातून मोठा मोबदला मिळू लागला आहे व जे पारंपरिक शेतकरी आहेत, त्यांचे नुकसान होत आहे. काही बड्या नेत्यांच्या जमिनी तर चारही बाजूंनी कॉर्नरवर आल्या आहेत. यामध्ये मातब्बरांचे कल्याण होत असून, प्रशासन शेतकºयांच्या बाजूने काहीही बोलण्यास तयार नसल्याचा आरोप बाळू हेकडे या शेतकºयाने केला. नेते येऊन गेले तरी शेतक-यांना न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.