ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे धास्तावले, त्यांचा आत्मविश्वास ढळला; केंद्रीयमंत्री प्रताप जाधवांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:55 IST2025-02-19T16:55:06+5:302025-02-19T16:55:39+5:30
सकाळी ९ वाजता वाजणाऱ्या भोंग्याला लोक कंटाळले असून, ठाकरे व राऊत यांनीही कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारावी.

ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे धास्तावले, त्यांचा आत्मविश्वास ढळला; केंद्रीयमंत्री प्रताप जाधवांचा टोला
छत्रपती संभाजीनगर : खऱ्या, खोट्या मोजमापाचा कुंभमेळा विधानसभा निवडणुकीतच झाला आहे. खरी शिवसेना कोणती, याचे उत्तर जनतेने दिले आहे, असा टोला केंद्रीय आयुष खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला.
केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी, महाराष्ट्राला मिळालेल्या योजनांची उजळणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळ्याला जाणार आहेत, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. यावर जाधव यांनी राऊत यांना टोला लगावला. सकाळी ९ वाजता वाजणाऱ्या भोंग्याला लोक कंटाळले असून, ठाकरे व राऊत यांनीही कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारावी. ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे धास्तावले असून, त्यांचा आत्मविश्वास ढळल्याचे ते म्हणाले. शिंदेसेनेच्या आमदारांची सुरक्षा काढल्याप्रकरणी ते म्हणाले, सुरक्षा आम्ही मागितली नव्हती, मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षा दिली होती. यावेळी भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, जालिंदर शेंडगे, दीपक ढाकणे आदींची उपस्थिती होती.
कॅन्सर लस अंतिम टप्प्यात....
कॅन्सर लस अंतिम टप्प्यात असून, चाचणी सुरू आहे. ९ ते १६ वयांतील मुलींना भविष्यातील कॅन्सरपासून सुरक्षा मिळावी, यासाठी ती लस असेल. लसीचे नाव जाधव यांनी सांगितले नाही. जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले. आयुष मंत्रालयाच्या विविध योजनांंची त्यांनी माहिती दिली.
मंत्री शिंदेसेनेचे अन् गर्दी भाजपची ..
जाधव हे शिंदेच्या कोट्यातून केंद्रातमंत्री आहेत. परंतु पत्रपरिषदेला शिंदेसेनेचे कुणीही नव्हते. फक्त भाजपचेच पदाधिकारी होते. मंत्री जाधव रवाना झाल्यानंतर शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आले. दुपारी २ वाजेची वेळ दिली होती. त्यामुळे मी आता आलो, असे जंजाळ म्हणाले.