अशीही कृतज्ञता ! उत्तम उपचारानंतर रुग्णाने घाटी रुग्णालयास दिले औषधी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 07:01 PM2018-01-12T19:01:45+5:302018-01-12T19:03:56+5:30
घाटी रुग्णालयावर सर्वसामान्य रुग्णांचा किती विश्वास आहे, याची प्रचीती एका घटनेतून आली. दुर्मिळ अशा आजाराने ३६ दिवस व्हेंटिलेटवर राहून आजारातून बाहेर पडलेल्या रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी घाटीला भेट म्हणून औषधी देऊन डॉक्टर आणि कर्मचार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयावर सर्वसामान्य रुग्णांचा किती विश्वास आहे, याची प्रचीती एका घटनेतून आली. दुर्मिळ अशा आजाराने ३६ दिवस व्हेंटिलेटवर राहून आजारातून बाहेर पडलेल्या रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी घाटीला भेट म्हणून औषधी देऊन डॉक्टर आणि कर्मचार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
घाटी रुग्णालयातील उपचारामुळे शेख फरीन शेख रियाज अहेमद (२८, रा. खोकडपुरा, पैठणगेट) या स्नायूंच्या दुर्मिळ अशा (मायस्थेनिया ग्रेविस) आजारातून बाहेर पडल्या आहेत. जवळपास अडीच महिन्यांपूर्वी त्यांना स्नायू कमकुवत होणे, स्नायू दुखणे, उजवा डोळा उघडता न येणे, श्वास घेण्यास अडचणी, असा त्रास सुरू झाला. प्रारंभी त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु फारसा फरक पडला नाही. आजारामुळे त्यांना चालणे, उठणे, बसणेही अवघड झाले. श्वास घेण्यास अधिक त्रास सुरू झाल्याने दीड महिन्यापूर्वी त्यांना घाटी रुग्णालयातय दाखल केले. येथील ‘एमआयसीयू’मध्ये तब्बल ३६ दिवस व्हेंटिलेटरवर त्या राहिल्या. यादरम्यान ५ वेळेस त्यांचे रक्तशुद्धीकरण करण्यात आले. डॉक्टरांनी घेतलेल्या परिश्रमामुळे त्या ९० टक्के या आजारातून बाहेर पडल्या.
शेख फरीन यांना बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कुटुंबातील सदस्य आजारातून बरा झाल्याने काहीतरी भेट स्वरुपात देऊन घाटीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना नातेवाईकांनी डॉक्टरांकडे व्यक्त केली. तेव्हा घाटीत काही औषधींचा तुटवडा असल्याचे समजले. ही बाब कळताच नातेवाईकांनी रुग्णालयास काही औषधी भेट स्वरुपात दिली. या घटनेने डॉक्टर आणि रुग्ण, नातेवाईक यांच्यातील विश्वास अधिक घट्ट होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले. सदर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, युनिट हेड डॉ. गजानन सुरवडे, डॉ. ममता मुळे, डॉ. राहुल वहाटुळे, डॉ. शिरीष शिंदे, डॉ. वीणा मालानी आणि इतर डॉक्टर, परिचारिकांनी परिश्रम घेतले.
डॉक्टरांचे सहकार्य
घाटीत दाखल झाल्यानंतरच आजाराचे निदान झाले. बहिणीवरील उपचारासाठी डॉक्टरांपासून सर्व कर्मचार्यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून काही औषधी दिली. घाटीतील डॉक्टर सर्व आजारांवरील उपचारासाठी तत्पर असल्याचे समोर आले, असे सय्यद इम्तियाज सय्यद एजाज यांनी सांगितले.