कारमधील 'त्या' नग्न कपलचा होरपळूनच मृत्यू; तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 04:40 PM2022-02-18T16:40:14+5:302022-02-18T16:41:24+5:30
मागच्या सीटवरील कोणताही भाग जळाला नाही. त्यामुळे प्रकरण संशयास्पद आहे. दोघांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.
औरंगाबाद : गांधेली शिवारातील आडरानात उभ्या कारमध्ये एसीचा स्फोट झाल्याने स्त्री-पुरुषाचा मृत्यू झाला होता. दोघांचा मृत्यू होरपळूनच झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पण या दोघांचे आपसात काय संबंध होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आरटीओ, गाडीची कंपनी आणि फॉरेन्सिक लॅबकडे गाडीत स्फोट कशाने झाला, हे तपासण्यासाठी नमुने पाठविण्यात आले असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी कारमधील एसीच्या स्फोटात रोहिदास गंगाधर आहेर (४८, रा. जवाहर कॉलनी), शालिनी सुखदेव बनसोडे (३८, रा. उल्कानगरी) यांचा मृत्यू झाला होता. रोहिदास हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे चालक होते. शालिनी या धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होत्या. हे दोघे आक्षेपार्ह स्थितीत असताना कारमध्ये एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक निरीक्षक एस. एस. रोडगे अधिक तपास करीत आहेत. रोहिदास यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, असा परिवार आहे. पैकी दोन मुली विवाहित आहेत. शालिनी यांना दोन मुली, दोन मुले आहेत. दोन्ही मुलींचे विवाह झालेले आहेत. रोहिदास आणि शालिनी या दोघांचे कुटुंबीय एकमेकांना ओळखत नाहीत. ते राहायलादेखील शेजारी नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख कशी झाली हा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलिसांनी कार, दोघांचे मोबाइल व इतर साहित्य जप्त केले आहे.
कारमध्ये स्फोट कशाने झाला?
जळाल्यानेच दोघांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. त्यामुळे एसीच्या स्फोटाची कारणे शोधण्यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, आरटीओ व संबंधित कंपनीला पत्र देऊन तांत्रिक तपास करण्यात येत आहे. मृतांचे चेहरे, हात, पाय होरपळले आहेत. मात्र गाडीचा थोडासा भाग सोडून इतर जळाला नाही. तसेच मागच्या सीटवरील कोणताही भाग जळाला नाही. त्यामुळे प्रकरण संशयास्पद आहे. दोघांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.