‘त्या’ सैनिकाचा मृत्यू झालेला, पत्नीला पेन्शनही सुरू, मात्र सैनिकाचे आई-वडील अनभिज्ञ!
By स. सो. खंडाळकर | Published: June 2, 2023 12:41 PM2023-06-02T12:41:22+5:302023-06-02T12:41:43+5:30
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लक्ष घातल्यामुळे वस्तुस्थिती आली समोर
छत्रपती संभाजीनगर : बेपत्ता सैनिक रवींद्र पाटील यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांची पत्नी छाया यांना पेन्शनही सुरू झाली; परंतु यापासून रवींद्रचे आई-वडील भागवत पाटील व बेबीताई पाटील अनभिज्ञ राहिले किंवा ठेवण्यात आले. त्यामुळे या दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यात लक्ष घातले. उपोषणस्थळी भेट दिली. त्यांना याकामी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दिल्लीत सूत्रे हलवल्यानंतर रवींद्र पाटील यांचा मृत्यू झाला असल्याचे व त्यांच्या पत्नीला पेन्शन सुरू असल्याची बाब उघडकीस आली.
डॉ. कराड यांनी दिल्लीत संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांना बेपत्ता सैनिकाची व त्याच्या आई-वडिलांच्या उपोषणाची माहिती दिली. भट यांचे सचिव पी.के. सुरेश कुमार, डॉ. कराड यांचे सचिव आनंद जोशी, माजी सैनिक अशोक हंगे, कृष्णा राठोड, बालाजी कोडगिरे, सुनील कुमार, मृत सैनिकाचे भाऊ संतोष पाटील यांच्याशीही चर्चा केली व सात वर्षांपेक्षा जास्त काळ बेपत्ता असलेला जवान मृत असल्याचे व या सैनिकाच्या पत्नीस २४ नोव्हेंबर २०२२ पासून पेन्शन लागू करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले.
रवींद्र पाटील हे सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिंपरीचे. ते सैन्यदलात जम्मू- काश्मीरमध्ये सीमेवर कार्यरत होते. १३ वर्षांपासून रवींद्र पाटील यांच्याबद्दल कोणतीही माहिती आई-वडिलांना नव्हती. सुटीवर मुलगा नक्की येईल, या आशेवर ते जगत होते. सैन्यदल प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही रवींद्रच्या आई-वडिलास कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. सैनिकाचे नातेवाईक आणि माजी सैनिक अशोक हंगे यांना डॉ. कराड यांनी दिल्लीत बोलवून घेतले. संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी स्वत: लक्ष घातल्यानंतर वरील बाब उघडकीस आली. अन्यथा रवींद्रचे आई-वडील तो जिवंत आहे, या आशेवरच राहिले असते.