छत्रपती संभाजीनगरातील शून्य मैलाचा तो दगड गेला थरांच्या आड
By विकास राऊत | Published: January 11, 2024 07:59 PM2024-01-11T19:59:43+5:302024-01-11T20:00:40+5:30
शून्य मैलाचा दगड शहराच्या मध्यवर्ती भागात लावण्यात येतो.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील शून्य मैलाचा दगड सिमेंट रस्ते आणि डांबरीकरणांच्या थराआड गेला आहे. मध्यवर्ती बसस्थानकालगत हा दगड सार्वजनिक बांधकाम विभागाने बसविला होता. आता दगड सध्या असल्याचे दिसत नाही. नियमितपणे केले जाणारे डांबरीकरण किंवा रस्त्याचे मजबुतीकरण करण्यामुळे सदरील दगड थरांच्या आड गेला असेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मत आहे.
स्थानकापासून विमानतळ, रेल्वेस्टेशन, ऐतिहासिक पर्यटनस्थळे किती किलोमीटरवर आहेत. याची माहिती त्या मैलाच्या दगडामुळे मिळणे शक्य आहे. आता गुगल मॅपवरूनच ठिकाण, अंतराची माहिती मिळविली जात आहे. त्यामुळे मैलाचे दगडही कमी प्रमाणात दिसत आहेत.
शून्य मैलाचा दगड कसा ठरतो?
शून्य मैलाचा दगड शहराच्या मध्यवर्ती भागात लावण्यात येतो. ५ ते १० कि.मी.च्या अंतरातील गाव, परिसर किती लांबवर आहेत. याची माहिती मिळावी, यासाठी तो दगड लावण्यात येताे.
कोठून किती अंतर?
बसस्थानक ते रेल्वेस्टेशन : बसस्थानक ते रेल्वेस्टेशन हे अंतर ४.९ कि.मी. आहे. बसस्थानकातील शून्य कि.मी. दगडापासून हे अंतर घेतल्याचे बांधकाम विभाग सांगते.
बसस्थानक ते विमानतळ : बसस्थानक ते विमानतळ हे अंतर ११ कि.मी. आहे. बसस्थानकापासूनच शहरातील सर्व ठिकाणचे अंतर काढण्यात येते.
शून्य मैलाचा दगड ठाऊक आहे का?
शहरात असा दगड पाहण्यात नाही, परंतु नागपूरला असल्याची माहिती आहे.
-प्रवीण इंगळे
शून्य मैलाचा दगड अलीकडच्या काळात पाहण्यात आलेला नाही.
-बापू कवळे
आता गुगल मॅपवरूनच अंतर कुठे किती हे पाहिले जाते, त्यामुळे दगडांकडे कोण पाहते.
-नितीन पाटील
शून्य मैलाचा दगड नागपूरमध्ये
शून्य मैलाचा दगड नागपूरमध्ये आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणापासून सर्व बाजूचे अंतर तेथूनच घेतले जाते. शहरात शून्य मैलाचा दगड असतो, असे काही ऐकिवात नाही. परंतु मध्यवर्ती बसस्थानक येथून सर्व ठिकाणचे अंतर काढले जाते. त्यामुळे तेथेच शून्य कि.मी.चे दगड असायचे. बसस्थानकापासूनच सगळे अंतर सध्या मोजले जाते.
-विवेक बडे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग