सजा सोडून शहरात थाटली तलाठ्यांनी कार्यालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:01 AM2018-12-16T00:01:26+5:302018-12-16T00:01:53+5:30
गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांची गैरसोय : झिरो तलाठ्यांना सुगीचे दिवस; नियम धाब्यावर
गंगापूर : गंगापूर तालुक्यात तलाठ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी वैतागले असून नेमून दिलेल्या सजेवर न जाता सोयीनुसार शहराच्या ठिकाणी त्यांनी कार्यालये थाटून कारभार सुरु केला आहे. यामुळे झिरो तलाठ्यांना सुगीचे दिवस आल्याने शेतकºयांची अडवणूक होत आहे.
गंगापूर तालुक्यात एकूण ५५ सजा आहेत. या सजांच्या अंतर्गत २२२ गावे आहेत. यात एका तलाठ्याकडे किमान ३ ते ६ गावांचा भार आहे आणि यातूनच एक गाव निवडून त्या ठिकाणी सजाचे कार्यालय असावे, असा नियम आहे. त्यांनी त्याच ठिकाणी थांबून आपली सेवा देणे बंधनकारक आहे .
गाव ठरवून त्या गावाला वेळ दिल्यास कामामध्ये सुसूत्रता येवू शकते. मात्र तसे होताना आढळून येत नाही.
संपादित जमिनीवरही अनुदान वाटप
अनेक गावात सातबारा उताºयांमध्ये तलाठ्यांच्या चुकीमुळे बदल होऊन एकाचे क्षेत्र दुसºयाच्या नावावर झाले आहे तर संपादित जमिनीवर अनुदान वाटप झाल्याचे प्रकार सिरेगाव, देवळी, सुलतानाबाद या गावात झाले आहेत.
पाझर तलाव व मध्यम प्रकल्पात अनेक जमिनी गेल्या असून या जमिनीचा मोबदला या लोकांना मिळाल्यानंतर जमिनी सातबाºयावर जशाच्या तशाच आहेत. याचा गैरफायदा तलाठी व झिरो तलाठी घेतात. ते शेतकºयांसह शासनाची फसवणूक करीत असल्याचे आढळून आले आहे.
गंगापुरात सर्वाधिक कार्यालये
सजा सोडून सर्वच तलाठ्यांनी गंगापूर शहरात आपली कार्यालये थाटली आहेत. या ठिकाणी टँकर प्रस्ताव तयार करणे, बोंडअळी, सातबारे दुरुस्ती, फेरफार करणे, विहीर नोंदी घेणे, सातबारा आदी कामांसाठी तलाठ्यांकडून शेतकºयांची मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते.
तलाठ्यांनी नेमून दिलेल्या सजेच्या ठिकाणी थांबणे बंधनकारक आहे. मात्र सर्वच तलाठी आपल्या सोयीनुसार गंगापूर, लासूर स्टेशन, वाळूज अशा ठिकाणी आपली कार्यालये सुरु करून प्रत्येकांनी आपल्या कार्यालयात झिरो तलाठी नेमला आहे. सदर झिरोकडून शेतकºयांची आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात आहे.
लिंबेजळगावच्या शेतकºयाचा आत्मदहनाचा इशारा
लिंबेजळगाव येथील रियाज पठाण व सुलतानाबी पठाण यांच्या मालकीची साडेपाच गुंठे जमीन आहे, मात्र तलाठ्याच्या चुकीने आॅनलाईन ७/१२ वर केवल दीड गुंठे एवढीच नोंद आहे. यातील बदल करुन पूर्ण प्लॉटची नोंद घेण्यात यावी, यासाठी संबंधित प्लॉटधारक पठाण यांनी लोकशाही दिनात धाव घेतली होती. लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाचा देखील अद्याप काहीच फायदा झालेला नाही. गेल्या ६ वर्षांपासून ते तलाठ्याचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र अद्याप फेरबदल झाला नाही. शेवटी पठाण यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
शहापूर शिवारातील ८३ गट नंबरमधील १ हेक्टर २१ आर. क्षेत्र शारदा अच्युत शिंदे यांच्या नावाने होते. आता हे क्षेत्र विशाल गोरखनाथ शिंदे व अनिता गोरखनाथ शिंदे यांचा नावावर दिसत आहे. याबाबत अच्युत शिंदे यांनी तहसीलदारांकडे तक्रार देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे.
बोंडअळीच्या लाभासाठीही अडचण
सध्या बोंडअळीचा लाभ दिला जात आहे. मात्र संबंधित शेतकºयांच्या कागदपत्रातील अक्षम्य चुकांमुळे अनेक शेतकरी आजही या अनुदानापासून वंचित आहेत. झिरो तलाठी व परस्पर नेट कॅफेवर तयार करण्यात आलेल्या बोंडअळीच्या यादीतील अक्षम्य चुकांमुळे लाभधारक त्रस्त झाले आहेत. सदर यादीतील दुरुस्तीसाठी दिवस दिवस तलाठ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तलाठी हा गावातील दक्षता कमिटीचा सचिव असताना देखील ग्रामीण भागात दक्षता संदर्भात कुठल्याच प्रकारची बैठक घेतल्याचे आढळून येत नाही.