जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फुटाने उघडले, दगडी पूल पाण्याखाली गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 06:21 PM2024-09-26T18:21:20+5:302024-09-26T18:21:36+5:30
गोदापात्रात ५७ हजार ९२ क्युसेक विसर्ग सुरू, आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता
पैठण (छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडी धरणाचीपाणीपातळी ९९.३९ टक्क्यावर पोहचली आहे. दरम्यान, जायकवाडी धरणक्षेत्र आणि धरणावरील परिसरात बुधवार रोजी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने आवक मोठयाप्रमाणावर वाढली आहे. यामुळे एक दिवसांपूर्वी एक फुट उंचीने उघडलेली जायकवाडी धरणाची २७ पैकी १८ दरवाजे तीन फुट उंच उघडून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या गोदावरीच्या पात्रात ५७ हजार ९२ क्युसेक विसर्ग धरणातून सुरू असून आवक लक्षात घेता आपत्कालीन दरवाजेही उघडण्याची शक्यता आहे.
बुधवार रात्रीपासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक ४४ हजार ७५२ क्युसेक वेगाने येत आहे. आवक वाढल्यामुळे पाटबंधारे विभागाने १ फुटावरील असलेले दरवाजे गुरुवारी तीन फूट उंच उघडून विसर्ग वाढविला. धरणाच्या बाजूला असलेल्या दगडी पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच नाथ मंदिराच्या परिसरातील दशक्रिया घाटाच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. धरणात येणारी आवक लक्षात घेता आणखीही विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जायकवाडी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेटिंग केली आहे. विसर्ग बघण्यास आलेल्या नागरिकांना अलीकडेच थांबविण्यात येत असून धरणाकडे चालत पाठवले जात आहे.