राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली ७६ मिनिटांत पार पडणार विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत सोहळा
By योगेश पायघन | Published: November 16, 2022 06:35 PM2022-11-16T18:35:38+5:302022-11-16T18:36:27+5:30
४१४ विद्यार्थ्यांना पीएच.डी करणार प्रदान; शरद पवार, नितीन गडकरींचा डि.लिट ने होणार सन्मान
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. १९) ११ ते १२.१६ वाजेपर्यंत १ तास १६ मिनिटांचा हा सोहळा असेल. पद्मभूषण डॉ. विजय भटकर या सोहळ्यात दीक्षांत भाषण करणार असून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट आणि ४१४ विद्यार्थ्यांना पीएच.डी, एमफिलची पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
हिवाळी २०२० आणि उन्हाळी २०२१ परीक्षासह या काळात पदवी प्राप्त करणाऱ्या पदव्यूत्तर पदवी धारक २ हजार ४८, पदवीधारक १ लाख २ हजार ८०९ जणांना महाविद्यालयात समारंभपुर्वक पदवी प्रदान करण्यात येईल. दीक्षांत समारंभानंतर महाविद्यालयात हे समारंभ आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्यानुसार या सोहळ्यांचे आयोजन महाविद्यालयांनी करावे. आठवडाभरात १२ सेक्यूरीटी फिचर्ससह पदवी प्रमाणपत्राची छपाई पुर्ण होऊन महाविद्यालयांना पाठवण्यात येईल. विद्यापीठ मुख्य परिसरात पदवी, पदव्यूत्तर पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी व एम.फिल पदवीचे वितरण सभारंमाच्या दिवशी परीक्षा विभागातील काउंटरवर मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी वितरण करण्यात येईल. चारही मान्यवर समारंभाला येणार असल्याचे निश्चित केले असून हा सोहळा ऐतिहासिक व संस्मरणीय ठरेल. असे कुलगुरूंनी सांगितले. पत्रकार परिषदेस प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, परीक्षा मंडळ संचालक डॉ.गणेश मंझा, प्रसिध्दी समिती अध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर, सचिव संजय शिंदे यांची उपस्थिती होती.
थेट प्रेक्षपण अन् विद्युत रोषणाई
नाटयगृहात होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याचे नाटयगृहाच्या बाहेर मंडपातही प्रेक्षपण होईल. तसेच ऑनलाईन थेट प्रक्षेपणही समाजमाध्यमांवर केले जाणार आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वार, नाटयगृह, छत्रपती शिवराय व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात सुभाभिकरण व विद्यूत रोषणाई करण्यात येत आहे.