'चिकलठाणा अत्याचार, खून प्रकरण;आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; धिक्कार सभेत संतप्त प्रतिक्रिया
By स. सो. खंडाळकर | Published: April 7, 2023 07:44 PM2023-04-07T19:44:20+5:302023-04-07T19:45:18+5:30
महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे देखील धिक्कार सभेत सहभागी झाले होते
छत्रपती संभाजीनगर: चिकलठाणा येथे २ एप्रिल रोजी या चर्मकार समाजाच्या महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व पीडितेच्या कुटुंबियांना शासनाने २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले पाहिजे, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरातील चर्मकार समाज गटतट बाजूला सारुन शुक्रवारी सायंकाळी क्रांतीचौकात एकवटला होता. यावेळी वक्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कॅंडल मार्च काढणे टाळण्यात आले. पीडितेचा पती, दोन मुली, एक मुलगीही या सभेला उपस्थित होती.
महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे या धिक्कार सभेत सहभागी होत, त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या पीडितेच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या पेटवल्या. ज्या पध्दतीने आरोपींनी बलात्क़ार करुन खून केला, तशीच कडक फाशीची शिक्षा या खुन्यांना झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. व पीडितेच्या कुटुंबाला अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या सभेत, आंबेडकरवादी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड, किसान कॉंग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्र रमंडवाल, नारायण बन्सवाल, माजी नगरसेवक मनोज गांगवे, सी.एम. रमणे गुरुजी, पी. आर. आंबेडकर, प्रभू कटारे, अशोक बन्सवाल, मोहनलाल गोरमे, संजय चिकसे, महादेव डांबरे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. व नराधमांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.
पीडित परिवारातील मुलांचा शैक्षणिक खर्च शासनाने उचलावा, परिवारातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी, घरकुलही उपलब्ध करुन देण्यात यावे या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. भरत बरथुने, हंसराज बन्सवाल, विशाल बन्सवाल, रामू जाटवे, मीनाबाई बरंडवाल, लता महेरा, मदन भीमरोट, खंडू पवार, निर्मला बन्सवाल, नंदू वराटे, गणेश गरंडवाल, विक्रम बन्सवाल,इम्रानखान समीखान, धनराज गांगवे, बन्सीलाल अंदोरे, दीपक ढवळे, अनिल जाधव आदींसह मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांध व भगिनींनी या सभेत सहभाग घेतला. त्यांच्या हातात फलकही होते.