प्रशासनही अवाक! छत्रपती संभाजीनगरातील तरुणांची कायमस्वरूपी नोकरीलाही सोडचिठ्ठी

By मुजीब देवणीकर | Published: August 30, 2024 02:25 PM2024-08-30T14:25:18+5:302024-08-30T14:25:45+5:30

महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळालेली अनेकांनी सोडली; कोणत्या पदांवरील कर्मचाऱ्यांचे राजीनामे?

The administration is speechless! youth rejected Permanent employment, A stunning picture from Chhatrapati Sambhajinagar | प्रशासनही अवाक! छत्रपती संभाजीनगरातील तरुणांची कायमस्वरूपी नोकरीलाही सोडचिठ्ठी

प्रशासनही अवाक! छत्रपती संभाजीनगरातील तरुणांची कायमस्वरूपी नोकरीलाही सोडचिठ्ठी

छत्रपती संभाजीनगर : बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लाखो तरुणांना शासकीय तर सोडाच, खासगी नोकरीही मिळायला तयार नाही. महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळालेली असताना काही तरुण अत्यंत बिनधास्त नोकरीला सोडचिठ्ठी देऊन निघून जात आहेत. त्यामुळे प्रशासनातील अधिकारीही अवाक झाले आहेत. कायमस्वरूपी नोकर भरती करताना मनपाने ८५ जणांना ऑर्डर दिली होती. त्यातील आठजण सोडून गेले. आणखी आठ ते दहा जण जाण्याच्या मार्गावर आहेत.

शासनाने काही वर्षांपूर्वी महापालिकेला कर्मचारी भरतीसाठी सुधारित आकृतिबंध मंजूर केला. त्यामध्ये सहा हजारांपेक्षा अधिक पदांना मंजुरी दिली. गरज भासेल त्या पद्धतीने भरती करावी, असे निर्देशही शासनाने दिले. सध्या महापालिकेत ३ हजारांहून अधिक कायमस्वरूपी अधिकारी, कर्मचारी आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्याही जवळपास दोन हजारांपर्यंत पोहोचली आहे. रिक्त पदांचा अनुशेष मोठा आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी मनपाने भरती प्रक्रिया राबविली. त्यामध्ये गुणवत्ता यादीनुसार ८५ जणांना नियुक्तीपत्र दिले. त्यातील ७१ जण रुजू झाले. या कर्मचाऱ्यांनी काही महिने काम केले. आता त्यातील काही कर्मचारी राजीनामा देऊन निघून जात आहेत. वेगवेगळ्या विभागांतील कर्मचाऱ्यांचे राजीनामा सत्र वाढल्याने प्रशासनही अवाक झाले आहेत.

कोणत्या पदांवरील कर्मचाऱ्यांचे राजीनामे?
कनिष्ट अभियंता पदावरील ३ जण, स्थापत्य अभियांत्रिकी ३, लेखा लिपिक म्हणून २ जणांनी सोडचिठ्ठी दिली. आणखी आठ ते दहा जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी आपल्या वरिष्ठांना यासंदर्भातील पूर्व सूचनाही देऊन ठेवली आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी
राजीनामा दिलेल्या उमेदवारांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आहे. अभ्यास करायला वेळ मिळत नाही. काहींनी परीक्षा दिल्या असून, निकाल येणे बाकी आहे. यापेक्षा चांगली नोकरी मिळाली तर सोडून जाणार, असे सांगितले आहे.

Web Title: The administration is speechless! youth rejected Permanent employment, A stunning picture from Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.