जेसीबीचा धक्का लागून जुन्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह निखळला; शहरात निर्जळी!
By मुजीब देवणीकर | Published: April 6, 2023 02:59 PM2023-04-06T14:59:48+5:302023-04-06T15:00:24+5:30
नवीन जलवाहिनी टाकताना फारोळा गावाजवळ जेसीबीचा धक्का १,२०० मिमी व्यासाच्या जुन्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हला लागला.
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २,५०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम जीव्हीपीआर कंपनीमार्फत सुरू आहे. जलवाहिनी टाकताना बुधवारी सायंकाळी फारोळा गावाजवळ जेसीबीचा धक्का १,२०० मिमी व्यासाच्या जुन्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हला लागला. त्यामुळे व्हॉल्व्ह निखळून २५ ते ३० फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. जलवाहिनी त्वरित रिकामी करून मनपाने दुरुस्तीचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती सुरू राहिल्याने आज शहरात पाणीपुरवठा होणार नाही, असे मनपाकडून कळविण्यात आले.
उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात कोणताही खंड पडून देणार नाही, उपलब्ध पाण्यावरच नागरिकांची तहान भागविण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सकाळी पत्रकारांना सांगितले. सायंकाळी मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. फारोळा गावाजवळ बुधवारी जलवाहिनी टाकण्यात येत होती. ज्याठिकाणी ही जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते त्या जागेला लागूनच १,२०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हच्या संरक्षणासाठी १,४०० मिलीमीटरचा पाइप होता. १,४०० मिलीमीटरच्या पाइपला धक्का लागला आणि हा पाइप एअर व्हॉल्व्हवर पडला. त्यामुळे एअर व्हॉल्व्ह फुटला, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. एअर व्हॉल्व्ह फुटल्यामुळे त्यातून २५ ते ३० फूट उंच पाण्याचे फवारे उडू लागले. सुमारे एक ते दीड तास हे फवारे उडत होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. फुटलेल्या एअर व्हॉल्व्हची जलवाहिनी पूर्णपणे रिकामी झाल्यावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीसाठी किमान सात तास लागतील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पाणीपुरवठा लांबणीवर
शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले. एक दिवसाने पुरवठा पुढे ढकलण्यात आला. गुरुवारी शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा होणार आहे, त्या भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होईल. मनपाकडून शक्य झाल्यास गुरुवारी कमी दाबाने पाणी देण्याचाही प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले.
पाणीपुरवठ्यातील विघ्न
२३ जानेवारी- फारोळ्यात मोठे लिकेज.
०१ फेब्रुवारी- नाथ सीड्सजवळ जलवाहिनी फुटली.
०६ मार्च- वादळ वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित.
०७ मार्च- पंपिंग अचानक बंद पडले.
०७ मार्च- वादळी वाऱ्याचा फटका.
२७ मार्च- फिडरमध्ये मोठा बिघाड.
३० मार्च- पंपात बॅक वॉटर शिरले.