ऐतिहासिक वास्तूंमुळे निओ मेट्रोची अलाईनमेंट बदलली
By मुजीब देवणीकर | Published: July 18, 2023 06:37 PM2023-07-18T18:37:38+5:302023-07-18T18:38:29+5:30
प्रकल्प आराखड्यात बदल करावा लागणार
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर एकच उड्डाणपूल, त्यावर निओ मेट्रो उभारण्यासाठी काही दिवसांपासून काम सुरू आहे. निओ मेट्रो प्रकल्प उभारणीत ऐतिहासिक वास्तूंचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अलाईनमेंट बदलावी लागणार आहे. प्रकल्प आराखड्यातही बदल करावा लागणार असल्याची माहिती सोमवारी निओ मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांना एका आढावा बैठकीत दिली.
स्मार्ट सिटी कार्यालयात कराड यांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक जी. श्रीकांत, महावितरणचे विभागीय सहसंचालक डॉ. मंगेश गोंदवले यांची प्रमुख उपस्थिती होती. निओ मेट्रोसह अखंड उड्डाणपुलाच्या डीपीआरचे सादरीकरण केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर अलीकडेच झाले. केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विमानाचे उड्डाण आणि लँडिंग करताना अखंड उड्डाणपुलाच्या उंचीचा अडथळा येत असल्याने नव्याने डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नव्याने अखंड उड्डाणपूल करण्यासाठी विमानतळासमोर चारशे मीटर जमीन लागणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार असल्यामुळे तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून विमानतळ प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर डीपीआर सादर करावा लागेल.
संरक्षण विभागाची जागा घेणार
अखंड उड्डाणपुलासाठी संरक्षण विभागाने जागा देण्यास नकार दिल्यामुळे ४ किमीपर्यंत जमिनीलगत काम करावे लागणार असल्याने त्याचा विचार करूनच डीपीआर बनविण्यात आला होता. संरक्षण मंत्रालयाची जागा घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी नव्याने डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मेट्रोच्या अलाईनमेंटमध्ये बदल
निओ मेट्रोच्या टप्पा-२च्या अलाईनमेंटमध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने दिल्लीगेट येथून निओ मेट्रोला जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे निओ मेट्रोच्या अलाईनमेंटमध्ये बदल करण्यात आला असून चांदणे चौक, सलीम अली सरोवर, टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर, हडको टी-पॉइंट, जळगाव रोड, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन असा मार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढणार असून, लवकरात लवकर डीपीआर तयार करून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.