छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण चिंताजनक; फुप्फुसाचे आरोग्य धोक्यात
By संतोष हिरेमठ | Published: December 2, 2024 06:17 PM2024-12-02T18:17:20+5:302024-12-02T18:18:26+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण अधिक, श्वसन विकाराला हातभार
छत्रपती संभाजीनगर : शहरातील हवेत पार्टिक्युलेट मॅटर अर्थात ‘पीएम’चे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढलेले आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. वातावरणात पार्टिक्युलेट मॅटरची पातळी वाढल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्यास हातभार लागत आहे. या ‘पीएम’चा परिणाम फुप्फुसांवर तर होतोच; त्याबरोबरच ते डोळे आणि श्वसनमार्गाला नुकसान पोहोचवीत आहे.
दरवर्षी २ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन’ पाळला जातो. १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा होत असतानाच छत्रपती संभाजीनगर शहराच्या हवेची गुणवत्ता संवेदनशील बनल्याचे समोर आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गंभीर शेरा असून, शहर राज्यात चौथ्या क्रमाकांवर आहे. फुप्फुस हा शरीरातील महत्त्वाचे अवयव असून, शुद्ध ऑक्सिजन शरीराला पोहोचवण्याचे काम करते. मात्र, बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि काही हानिकारक गोष्टींमुळे फुप्फुसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
‘डब्ल्यूएचओ’ सांगितलेली मर्यादा किती?
शहरातील हवेत पीएम अर्थात पार्टिक्युलेट मॅटर २.५ आणि पीएम १० अशी पार्टिकलची पातळी वाढली आहे. ‘डब्ल्यूएचओ’ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनुसार २४ तासांत हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० पार्टिक्युलेट मॅटर अनुक्रमे १५ आणि ४५ पेक्षा जास्त नसावेत.
शहरातील रविवारी दुपारी २ वाजण्याची स्थिती
- २.५ मायक्रॉनअंतर्गत कण (पीएम २.५) : ६७.३ मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर
- १० मायक्रॉनअंतर्गत कण (पीएम १०) : १०७.० मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर
- नायट्रोजन ऑक्साइड : १७.२ मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर
- सल्फरडाय ऑक्साइड : १८.२ मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर
- कार्बन मोनोक्साइड : ८००. ० मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर
काय आहे पीएम २.५ आणि पीएम १०?
पीएम २.५ आणि पीएम १० हे कण अनुक्रमे २.५ आणि १० मायक्रॉन व्यासाचे असतात, जे हवेत असतात. हे इतके लहान आहेत की ते श्वसनमार्गाद्वारे फुप्फुसापर्यंत पोहोचतात. पीएम २.५ फुप्फुसाच्या आतील थरापर्यंत पोहोचतो. पीएम १० फुप्फुसाच्या वरच्या भागावर परिणाम करतो. पीएम २.५ आणि पीएम १० हे वेगवेगळ्या उत्सर्जन स्रोतांपासून बाहेर पडतात. यांची रासायनिक संरचनाही वेगळी असते. पीएम २.५ हे पार्टिकिल्स गॅसोलीन, तेल, डिझेल इंधन किंवा लाकूड जाळल्यानंतर निघणारा धूर यांतून तयार होते; तर बांधकामाच्या ठिकाणी असलेली धूळ किंवा कचरा, औद्योगिक ठिकाणे आणि हवेतील धूळ, परागकण यांपासून पीएम १० पार्टिकल तयार होतात.
फुप्फुसासाठी हे हानिकारक...
- फुप्फुसाच्या कर्करोगासाठी धूम्रपान हे सर्वांत मोठे कारण मानले जाते.
- सिगारेटमधील रसायने : तंबाखूमध्ये निकोटिन आणि ७० हून अधिक कर्करोगजन्य रसायने असतात.
- धूम्रपानापाठोपाठ हवेतील सूक्ष्म कण फुप्फुसात जमा होऊन कर्करोग होऊ शकतो.
- चूल किंवा लाकडे जाळल्याने होणारा धूरही फुप्फुसांना हानी पोहोचवतो.
- औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारी बेंझिन, निकेल आणि क्रोमियम यांसारखी रसायने फुप्फुसांचे नुकसान करतात.
ही घ्या काळजी...
- वायुप्रदूषणापासून बचावासाठी मास्कचा वापर करा.
- रासायनिक आणि औद्योगिक संपर्क टाळण्याचा प्रयत्न करा.
- घर आणि आजूबाजूचा परिसर प्रदूषणापासून सुरक्षित ठेवा.
- शारीरिक तंदुरुस्ती कायम ठेवा आणि पोषणयुक्त आहार घ्या.
- नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्या, विशेषतः धोक्याच्या क्षेत्रात राहत असल्यास.
तीव्रता वाढीस हातभार
एखाद्या व्यक्तीला श्वसनविकार असेल तर प्रदूषित वातावरणाने त्या विकाराची तीव्रता वाढण्यास हातभार लागतो. धुलिकण आरोग्यासाठी अपायकारक आहेत. घाटीतील श्वसनशास्त्र विभागातील ओपीडीत दररोज साधारण ६० रुग्ण येतात.
- डाॅ. अविनाश लांब, श्वसनविकारशास्त्र विभागप्रमुख, घाटी
प्रदूषणासह इतर बाबीही कारणीभूत
प्रदूषण, सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन हे फुप्फुसाच्या कर्करोगाला आमंत्रण देणारे ठरते. खोकला आहे, म्हणून रुग्ण वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे तिसऱ्या, चौथ्या स्टेजला येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
- डाॅ. बालाजी शेवाळकर, किरणोपचारशास्त्र विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय