बहिणींच्या रकमेला बँकांची कात्री, मिनिमम बॅलन्सच्या फटक्याने हाती आले अवघे हजार रुपये

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 17, 2024 06:46 PM2024-08-17T18:46:15+5:302024-08-17T18:47:11+5:30

बँकांच्या शाखेसमोर महिलांची मोठी गर्दी; २० टक्के महिलांचे आधार लिंकच नाही

The amount of the Ladaki Bahin Scheme was reduced to Rs 1 thousand due to minimum balance rule | बहिणींच्या रकमेला बँकांची कात्री, मिनिमम बॅलन्सच्या फटक्याने हाती आले अवघे हजार रुपये

बहिणींच्या रकमेला बँकांची कात्री, मिनिमम बॅलन्सच्या फटक्याने हाती आले अवघे हजार रुपये

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने लाडक्या बहिणीची ओवाळणीचे ३ हजार रुपये खात्यात जमा केले. पण मिनिमम बॅलन्सच्या (कमीत कमी जमा) नावाखाली बँकेने दंड वसूल केल्याने महिलांच्या हाती अवघे ५०० ते १ हजार रुपये आले.

शुक्रवारचा दिवस बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रचंड तणावात गेला. कारण, बँक खाते आधार लिंक करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर सकाळपासूनच १०० ते ५०० महिला रांगेत उभ्या होत्या. त्यात लाडक्या बहीणी योजनेचे पैसे बँकेत जमा झाले ते काढण्यासाठी व आपल्या खात्यात किती रक्कम जमली हे पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. खात्यात जमा झालेल्या ३ हजारांपैकी फक्त ५०० ते हजार रुपयेच हातात आल्याने महिला खातेदार हैराण झाल्या. बाकीची रक्कम कुठे गायब झाली? असा सवाल त्यांनी केला. बँकवाल्यांनी आमचे पैसे खाल्ले, असा आरोप त्या करीत होत्या. बँकेच्या अधिकाऱ्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की, खात्यात कमीत कमी जेवढी रक्कम पाहिजे तेवढी नसल्याने तुम्हाला दंड लागला व ती रक्कम सिस्टिमने कपात करुन घेतली. यामुळेही महिला खातेदारांचे समाधान झाले नाही. आज दिवसभर एवढी गर्दी होती की, बँक कर्मचाऱ्यांना जेवण सोडाच; पण चहा पिण्यासाठीही वेळ मिळाला नाही. काही बँकेत उशिरापर्यंत काम सुरू होते.

आधार लिंककडे दुर्लक्ष नको
२० टक्के बँक खात्यांचे आधार लिंक झालेले नाही. बँकांनी वेळोवेळी आधार लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण त्याकडे कानाडोळा केला. तसेच मिनिमम बॅलन्स खात्यात नसल्याने बँकेच्या सिस्टिमने रक्कम कपात केली. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कपात केली नाही, हे खातेदारांनी समजून घ्यावे.
- देवीदास तुळजापूरकर, समन्वयक, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन

जिल्ह्यातील ५०७ शाखांसमोर गर्दी
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, डीसीसी बँक असे सर्व मिळून ३८ बँका आहेत. त्यांच्या ५०७ शाखांसमोर महिलांनी गर्दी केली होती. आधार लिंक करणे, खात्यात रक्कम जमा झाली का? विचारण्यासाठी, खात्यातून रक्कम काढण्यासाठी एवढे नव्हे तर जमा झालेली रक्कम का कपात करण्यात आली, याचा जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती.

नोटाबंदी झाल्यानंतरही एवढी गर्दी उसळली नव्हती
८ नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केली होती. त्यानंतर नोटा बदलून घेण्यासाठी एवढी गर्दी झाली नाही, तेवढी लाडक्या बहीण योजनेसाठी बँकांसमोर आज झाली, अशी माहिती महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी दिली.

आधार लिंकसाठी पुरुषांचीही गर्दी
महिलाच नव्हे तर पुरुषांनीही आपली आई, पत्नी, बहिणीच्या नावावर पैसे जमा झाले की नाही, हे पाहण्यासाठी बँकेत गर्दी केली होती. भविष्यात आपल्या खात्यातही सरकार रक्कम जमा करेल, या आशेने अनेक पुरुष आधार लिंकसाठी रांगेत उभे होते.

Web Title: The amount of the Ladaki Bahin Scheme was reduced to Rs 1 thousand due to minimum balance rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.