महापालिकेचा निवृत्त होतोय कणा; दरवर्षी तब्बल दीडशे कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती
By मुजीब देवणीकर | Published: October 14, 2023 06:29 PM2023-10-14T18:29:10+5:302023-10-14T18:30:02+5:30
महापालिकेत १९८८-९० पर्यंत मोठ्या प्रमाणात भरती झाली; पण नंतर मनपाने मोठी भरती प्रक्रियाच राबविली नाही.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या कारभाराचा कणा म्हणून ओळख असलेले वर्ग- ३ आणि ४ मधील कर्मचारी मागील काही वर्षांपासून मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे कामकाजावर मोठा परिणाम होतोय. पूर्वी सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यावर लाड-पागे समितीनुसार त्यांच्या पाल्यांना सेवेत घेतले जात होते. खंडपीठाच्या स्थगितीमुळे मार्च महिन्यापासून ही प्रक्रियाही थांबली आहे. लाड-पागे समितीसमोर अर्जांचा ढीग लागला आहे.
महापालिकेत १९८८-९० पर्यंत मोठ्या प्रमाणात भरती झाली; पण नंतर मनपाने मोठी भरती प्रक्रियाच राबविली नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी निवृत्त होण्याचे प्रमाण पाच ते सात वर्षांमध्ये झपाट्याने वाढले. दरवर्षी सुमारे १०० ते १५० अधिकारी, कर्मचारी निवृत्त होतात. यामुळे कनिष्ठ अभियंते, लिपिकांना प्रभारी म्हणून अनेक मोठी पदे देण्याची वेळ प्रशासनावर ओढवली. शासनाने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला कर्मचारी भरतीची परवानगी दिली. ११४ पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्जही मागविले. ९ हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले; परंतु खासगी कंपनी परीक्षा कधी घेणार, हे प्रशासनाला सांगायला तयार नाही. शहरातील १८ लाख नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी लागतात. त्यामुळे महापालिकेने २०१४ पासून कंत्राटी धोरण स्वीकारले. १२०० पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी मनपात आहेत. बचतगटांमार्फत घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वेगळीच आहे.
यंदा १५७ जण होणार निवृत्त
जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये महापालिकेतील वर्ग १ मधील ८ अधिकारी निवृत्त होत आहेत. वर्ग-२ मध्ये १ जण, वर्ग- ३ मधील ४४ आणि वर्ग-४ मध्ये सर्वाधिक १०४ कर्मचारी निवृत्त होतील. निवृत्तांचा एकूण आकडा १५७ आहे. त्यातील काही अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतरही सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यांना दिलेले प्रशासकीय, आर्थिक अधिकार हा विषय गंभीर बनतोय.
सफाई कर्मचाऱ्यांचा तुटवडा
शहर लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कर्मचारी दीड हजारच आहेत. त्यातही निवृत्तांची संख्या वाढतेय. त्यांच्या पाल्यांना नोकरीत घेता येत नाही. त्यामुळे मनपासमोर कंत्राटीशिवाय दुसरा पर्याय नाही.
पुढच्या महिन्यात परीक्षा
भरतीसाठी खासगी कंपनीकडे वारंवार मनपा प्रशासन पाठपुरावा करीत आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घ्यावी, असा प्रयत्न सुरू आहे.
- रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त, मनपा.