'पोटशूळ उठला असेल'; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर अब्दुल सत्तारांचे जोरदार प्रतिउत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:21 PM2022-08-08T14:21:09+5:302022-08-08T14:22:29+5:30
मंत्रीमंडळ विस्ताराआधी माझी बदनामी करणाऱ्यांकडे पाहतो, कायदेशीर कारवाई केली जाईल
औरंगाबाद: टीईटी घोटाळ्यात समाविष्ट असलेल्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तारांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून सत्तारांवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर , आता अब्दुल सत्तर यांनाच शिक्षणमंत्री करतील, अशी खोचक टीका केली आहे. यावर सत्तारांनी देखील जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. चव्हाण यांचा पोटशूळ उठला असेल. मला याच्यावर अधिक नाही बोलयाचे, असे सत्तार म्हणाले.
शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून दिलेल्या टीईटी घोटाळ्यात हजारो उमेदवार समाविष्ट असल्याचे पुढे आले आहे. अशांची नावेच शिक्षण विभागाने प्रकाशित केली आहे. मात्र, या यादीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव यादीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही यादी व्हायरल झाल्याने यावर सत्तार यांनी स्वतः खुलासा केला असून हे सर्व फेक आहे. या मागे षडयंत्र आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असे म्हटले आहे. दरम्यान, ही यादी बाहेर येताच सत्तारांवर चौफेर टीका होत आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी "अब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील" असं म्हणत टीईटी घोटाळ्यावरून खोचक टोला लगावला आहे. "टीईटी घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवू. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तार यांनाच ते शिक्षण मंत्री करतील. मग सगळाच निकाल लागेल. राज्यात अस्थिरता असेल तर अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कुणाला कोणते खाते मिळणार? तेच लोक बघतात. त्यामुळे बाकीच्या गोष्टी लपून जातात" असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे.
पोटशूळ उठला असेल, सत्तारांचे प्रतिउत्तर
औरंगाबादमध्ये या प्रकरणावर माध्यमांसोबत सत्तारांनी संवाद साधला. दरम्यान, पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेवर सत्तारांना प्रश्न विचारला. यावर सत्तार यांनी संताप व्यक्त केला आहे. चव्हाण यांचा पोटशूळ असेल. त्यांच्या मनामध्ये काय असेल, ते महाविकास आघीडीचे सरकार असतानाही दिसत होते. आता तो गोळा बाहेर आला असेल. यावर आता जास्त बोलयाचे नाही, असे सत्तार म्हणाले. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराआधी माझी बदनामी करणाऱ्यांकडे पाहतो, कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सत्तारांनी दिला.