उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्रतिसाद नसणाऱ्या महाविद्यालयांना विद्यापीठ नोटीस बजावणार
By राम शिनगारे | Published: March 21, 2024 11:49 AM2024-03-21T11:49:21+5:302024-03-21T11:50:35+5:30
कमी सहभाग असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नोटीस देत, सहभाग का घेतला गेला नाही, याबाबत विचारणा केली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन उत्तरपत्रिका मूल्यांकनात सहभाग न घेणाऱ्या, अत्यल्प सहभाग असलेल्या महाविद्यालयांना नोटीस पाठविणार आहे. यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. वारंवार सूचना देऊनही उत्तरपत्रिका मूल्यांकनास तपासणीच्या कामात प्राध्यापकांचा सहभाग कमी होता. अनेक महाविद्यालयांकडून तपासणीला प्राध्यापकच आले नाहीत, अशा महाविद्यालयांचा परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यात हा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक नुकतीच कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत नोव्हेंबर-डिसेंबर सत्रातील परीक्षेच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. परीक्षेनंतर निकालाची प्रक्रिया लांबली होती. परीक्षांचे निकाल ३० दिवसांत जाहीर होणे अपेक्षित असताना अडीच, तीन महिन्यांनंतर अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. विद्यापीठाअंतर्गत विविध १३५ अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ३ लाख ५३ हजार ७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सत्र परीक्षेत पदवीच्या तुलनेत पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत जाहीर होऊ शकले नाहीत. त्यात आता मूल्यांकनाच्या कामात महाविद्यालयनिहाय सहभागी प्राध्यापकांचा आढावा घेण्यात आला. कमी सहभाग असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नोटीस देत, सहभाग का घेतला गेला नाही, याबाबत विचारणा केली जाणार आहे. मूल्यांकनासाठी चार जिल्ह्यांत १६ तपासणी केंद्र होती. विद्यापीठ मुख्य परिसरासह उपपरिसरातील केंद्रांचा समावेश आहे.
अनेक महाविद्यालयांत प्राध्यापकच नाहीत
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ४७६ एवढी आहे. त्यापैकी १५७ पेक्षा अधिक ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग चालतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पात्र प्राध्यापक असण्याचा नियम आहे; परंतु अनेक ठिकाणी पात्र प्राध्यापकच नसल्यामुळे महाविद्यालयांकडून मूल्यांकनांसाठी प्रतिसाद मिळाला नाही. मूल्यांकनाच्या कामासाठी संबंधित विषयांच्या प्राध्यापकांना केंद्रांवर पाठविण्याबाबत प्राचार्यांना सुमारे चारवेळा पत्र देण्यात आले. तरीही असंख्य प्राध्यापकांनी मूल्यांकनाच्या कामात सहभाग नोंदविला नाही. त्यामुळे मूल्यांकनाची गती मंदावली. सहभाग कमी, अत्यल्प असलेल्या शंभर महाविद्यालयांना याबाबत समज दिली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.