‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणा देणाऱ्या आंदोलकांवर दाखल गुन्हा खंडपीठाकडून रद्द
By बापू सोळुंके | Published: October 19, 2024 05:37 PM2024-10-19T17:37:14+5:302024-10-19T17:38:16+5:30
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत खोके आणि कापूस फेकला होता. याप्रकरणी धरणगाव (जि. जळगाव) पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी रद्द केला.
सन २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. तेंव्हापासून उद्धव सेनेकडून शिंदेगटाच्या आमदारांविरोधात ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत आंदोलन सुरू झाले. मार्च २०२३ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार धरणगाव येथे अतिवृष्टीची पाहणी करीत होते. तेव्हा याचिकाकर्ते शरद रामदास माळी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ते कापसाला भाव द्या, अशी मागणी करीत होते. शिवाय ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत आंदोलन सुरू केले. मंत्री तेथून निघून गेल्यानंतर धरणगाव पोलिस ठाण्यात आंदोलकांविरोधात दंगल करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा विविध आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता.
हा गुन्हा रद्द करावा, यासाठी माळी यांनी ॲड. भूषण महाजन यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रत्येक जमावाचा उद्देश दंगल करणे असा असतोच असे नाही, असे नमूद करत धरणगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील ए. आर. काळे यांनी बाजू मांडली.