हत्या आणि आरोपीमध्ये कडी जुळली नाही; बहुचर्चित खून प्रकरणात पुराव्याअभावी आरोपी मुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 07:14 PM2022-05-20T19:14:18+5:302022-05-20T19:18:29+5:30
वैद्यकीय शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या झाल्याचे सिद्ध, मात्र हत्या आणि आरोपीमधील कडी जुळवता आली नाही.
औरंगाबाद : फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या झाल्याचे सरकार पक्षाने सिद्ध केले. मात्र हत्या आणि आरोपीमधील कडी त्यांना संशयाच्या पलीकडे जुळवता आली नाही. म्हणून आरोपी संशयाचा लाभ घेण्यास हकदार आहे, असे निरीक्षण नोंदवीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी नुकतीच या गुन्ह्यातील उत्तर प्रदेशातील आरोपी राहुल शर्मा याची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली.
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील गंगा वसतिगृहामधील खोली क्रमांक ३३४ मध्ये १० डिसेंबर २०१८ रोजी रात्री विद्यार्थिनीची हत्या झाली होती. याबाबत उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या फिर्यादीवरून सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी तपास केला होता. राहुल भुसावळ रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील त्याच्या गावी पळून जात असताना सिडको ठाण्याचे उपनिरीक्षक सी.व्ही. ठुबे यांच्या पथकाने त्याला रेल्वेतच पकडले होते.
सुनावणीवेळी सरकारतर्फे अतिरिक्त लोकअभियोक्ता सतीश मुंडवाडकर यांनी १७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. मयताच्या खोलीत आरोपीच्या बोटांचे ठसे मिळाले. सीसीटीव्हीत आरोपी दिसून आला. मयताची सोन्याची साखळी आरोपीने उत्तर प्रदेशातील त्याच्या घरातून काढून दिली. घटनेनंतर आरोपी तात्काळ पळून जात होता, डीएनएचे नमुने जुळले, असे मुद्दे त्यांनी मांडले.
आरोपीतर्फे ॲड. अविनाश बांगर यांनी असे मुद्दे मांडले की, साखळी हिसकावली, पण ती तुटलेली आढळली नाही. साखळी उत्तर प्रदेशात जप्त केली, पण तेथे पंचनामा केलेला नाही. बोटांचे ठसे नेमके कुठल्या बोटाचे आहेत हे सिध्द केलेले नाही. सीसीटीव्हीत नेमका कोण आहे आणि तो कुठे उभा आहे, हे स्पष्ट दिसत नाही. मयत आणि आरोपीमध्ये आधीपासून संबंध होते त्यामुळे डीएनए जुळले, असा युक्तिवाद त्यांनी केला.