टीईटीनंतरचा मोठा घोटाळा; बनावट वेबसाईटद्वारे ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 02:05 PM2023-05-09T14:05:34+5:302023-05-09T14:06:39+5:30

छत्रपती संभाजीनगरच्या टोळीचा कारनामा; प्रत्येकी ३५-५० हजार रुपये उकळले

The Big Scam After TET; 10th pass certificate given to 700 people through fake website by the Chhatrapati Sambhajinagar gang | टीईटीनंतरचा मोठा घोटाळा; बनावट वेबसाईटद्वारे ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र

टीईटीनंतरचा मोठा घोटाळा; बनावट वेबसाईटद्वारे ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र

googlenewsNext

पुणे / छत्रपती संभाजीनगर : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनविणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने चक्क महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट वेबसाइट बनवून त्याद्वारे तब्बल ७०० जणांना बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून संदीप ज्ञानदेव कांबळे (रा. सांगली) याच्याशी संपर्क केला. कांबळे याने दहावी पासच्या प्रमाणपत्राला ६० हजार रुपये लागतील असे सांगितले. बनावट ग्राहकाने ३९ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर उरलेले १६ हजार रुपये घेण्यासाठी संदीप कांबळे हा स्वारगेटला आला असता त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव), सय्यद इम्रान सय्यद इब्राहीम (रा. संभाजीनगर) यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी या तिघांना अटक केली. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पाेकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करीत आहेत.

२०१९ पासून सुरू केली वेबसाइट
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सुरू करण्यात आली आहे. या टोळीने त्यांच्यासारखीच दिसेल, अशी वेबसाइट २०१९ पासून सुरू केली. या टोळीने दहावी पास असलेल्याचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या तपासात ३५ जणांना त्यांनी १०वी पासचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. या वेबसाइट व त्यांच्या कारनाम्याची तपासणी केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत ७०० जणांना अशाप्रकारे बनावट १०वी, १२वी पासचे प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे.

प्रत्येकी ३५-५० हजार रुपये उकळले
प्रमाणपत्र देण्यासाठी या टोळीने अनेक ठिकाणी एजंट नेमले होते. संदीप कांबळे याच्यासारखे एजंट ज्यांना १०वी पासचे प्रमाणपत्र गरजेचे आहे, अशांसोबत संपर्क साधत. त्यांच्याकडून पैसे घेऊन प्रमाणपत्र दिले जात होते. त्यासाठी ३५ हजार ते ५० हजार रुपये घेतले जात होते. नोकरी, व्यवसाय, कर्ज तसेच अन्य कामांसाठी दहावी पास ही अट ठेवली असल्याने अनेकजण इतके पैसे देऊन हे प्रमाणपत्र घेत असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे.

Web Title: The Big Scam After TET; 10th pass certificate given to 700 people through fake website by the Chhatrapati Sambhajinagar gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.